कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याचे आजरा येथे  मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे होते. आमदार शिवाजीराव पाटील, संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष  नवीद मुश्रीफ, पद्मजा आपटे, समितीचे अध्यक्ष महादेव उर्फ बापू टोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.

मंत्री आबिटकर म्हणाले, छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा ही आजरा तालुक्याच्या जनतेची स्वप्नपूर्ती आज साकारली गेली. या पुतळ्याचे उदघाटन करण्याचे भाग्य लाभले हेच माझ्या आयुष्याचे सार्थक आहे.

अर्धपुतळा ते अश्वारूढ पुतळा

स्वागत आणि प्रास्ताविक करताना विलास नाईक यांनी शहरातील शिवाजी महाराज पुतळा प्रवास कथन केला. ते म्हणाले की, १९६७ साली मुंबईकर गिरणीकामगार यांनी वर्गणी काढून छत्रपतींचा अर्धपुतळा तयार केला. कै. काशिनाथआण्णा चराटी, कै. बळीरामजी देसाई, कै. वसंतराव देसाई यांनी पुढाकार घेऊन या पुतळ्याचे नियोजन केले होते. परंतु २०१७ साली गावसभा घेऊन कै. बाबुराव कुंभार यांचे अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून चर्चा करण्यात आली. कमिटीने अनेक पुतळे बघितले. शिवाजी विद्यापीठाच्या पुतळ्याप्रमाणे पुतळा करण्याचे ठरले. त्यात बेळगावचे मॉडेल पसंत केले. करोनासारख्या आपत्तीमुळे दोन वर्षे फुकट गेली आणि काही तांत्रिक अडचणीही आल्या त्यामुळे या कामाला सात वर्षे लागली. या पुतळ्याला मंत्री आबिटकर यांनी ५० लाखाचा फंड दिला. खासदार मंडलिक यांनी १० लाख, पुण्याचे गोवेकर यांनी विद्युत रोषणाईची व्यवस्था त्याचप्रमाणे रवींद्र आपटे यांनी सुद्धा देणगी गोळा करण्यासाठी मोठे योगदान दिले. जिल्हा परिषदेची जागा असलेने आनंदा कुंभार आणि समीर देशपांडे यांनी पाठपुरावा केला तर यासाठी हसन मुश्रीफ यांनी मदत केली.

दिवसभर उत्साह

तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग, नेत्रदीपक आतषबाजी, शिवशाही पोवाडे,नाशिक ढोल ताशा पथक, कलश पूजन अशा कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल सुरु राहिल्याने आजऱ्यात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.

यासमयी शिवाजीराव पाटील यांनी दहा लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले.डॉ. अशोक बाचूळकर यांनी अप्रतिम सूत्र संचालन केले. यावेळी मुकुंददादा देसाई, सुधीर देसाई, जयवंतराव शिंपी, के. पी. पाटील,अंज रेडेकर, सुनील शिंत्रे, नागेश चौगुले, जोत्स्ना चराटी, सुनील शिंत्रे, तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी संजय ढमाळ, आदिजण महिला, युवा तसेच सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार आनंदा कुंभार यांनी मानले.