कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभा प्रणित ऊस उत्पादक महासंघाच्या वतीने येत्या गुरुवारी (२१ ऑगस्ट ) सकाळी ११ते ४ यावेळेत राजर्षि शाहू स्मारक भवन येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महाराष्ट्र राज्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस किसान सभा व ऊस उत्पादक महासंघाचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. उदय नारकर यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.

या परिषदेसाठी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय सचिव विजू कृष्णन, अखिल भारतीय ऊस उत्पादक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तामिळनाडूचे डी रवींद्रन, किसान सभा राज्य सचिव डॉ. अजित नवले, उमेश देशमुख उपस्थित राहणार आहेत.

ऊसाला प्रति टन एक रक्कमी रुपये पाच हजार रुपये दर द्या, रिकवरीचा बेस पूर्वी प्रमाणे ९.५ टक्के करा, दुय्यम उपपदार्थातील उत्पन्नाचा वाटा शेतकऱ्यांना द्या त्यासाठी कायद्यामध्ये आवश्यकते बदल करा, साखरेसाठी घरगुती व औद्योगिक अशी दुहेरी दर प्रणाली सुरू करा, साखरेची किमान विक्री किंमत ४५ रुपये प्रति किलो करा, तोडणी वाहतूक यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीला पायबंद घाला, क्रंमपाळीनुसार ऊस तोडून एक सप्टेंबर पूर्वी गावातील सार्वजनिक ठिकाणी क्रमपाळी प्रसिद्ध करा, वजन काट्यांमध्ये पारदर्शकता, राजकारण न करता गरजेच्या सर्व सहकारी साखर कारखान्यांना कर्ज थकहमी द्या, जिल्ह्यातील ऊस शेती उध्वस्त करणाऱा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, इत्यादी मागण्यासाठी ही ऊस परिषद घेण्यात येणार असल्याचे उदय नारकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राची ऊस उत्पादकता व साखर उतारा न वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी हगामनिहाय ऊस लागवडीखालील क्षेत्र व पकतेनुसार ऊस जातीच्या तोडणीचा अभाव, हंगामनिहाय उसाच्या सुधारित जातींची निवड व त्यांच्या लागवडीचे अयोग्य नियोजन, शुद्ध व निरोगी ऊस बेणे पुरवठा होण्यासाठी त्रिस्तरीय बेणेमळ्याचा अभाव, पाण्याचे अयोग्य नियोजन आदी.

ऊस परिषदेचे स्वागताध्यक्ष भाई बाबासाहेब देवकर तसेच प्राचार्य ए.बी. पाटील,प्रा. सुभाष जाधव, ॲड.अमोल नाईक यांनीही ऊस परिषदेची भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. पत्रकार परिषदेस लक्ष्मण पाच्छापुरे, चंद्रकांत कुरणे, युवराज भोसले, बाबासाहेब खाडे, चव्हाण, विवेकानंद गोडसे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.