बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करून देखील मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहायक कामगार आयुक्तालय कार्यालयाची सोमवारी आरपीआय आठवले गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. बांधकाम कामगार आयुक्तांच्या दालनातील खुच्र्या, टेबल, लॅपटॉप, फॅन, काचा यासह अन्य साहित्याची मोडतोड केली. दुपारी २० ते २५ कार्यकर्त्यांनी कामगार आयुक्तालय कार्यालयावर फावडे, लेवल पट्टी, थापी, खोर यांच्यासह हल्लाबोल करत कार्यालयाचे सुमारे तीन लाखांचे नुकसान केले. पोलिसांनी आरपीआयच्या ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली. राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले मोडतोड आंदोलन चच्रेला कारण ठरले.
या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आरपीआयच्या ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केले. अनिल राजू जाधव, कुमार यल्लाप्पा इंगळे, अशोक तुकाराम घोलप, गुरुनाथ अशोक कांबळे, आण्णा बजरंग डावाळे, अरुण प्रकाश दबडे, सूरज गोरख चव्हाण, राजू प्रकाश कोळेकर, देवदास श्रीहरी नागटिळे, संतोष रामचंद्र कांबळे (सर्व रा. राजेंद्रनगर), राजू दयाप्पा िशदे (रा. मोरेवाडी, ता. करवीर), भागवत सिद्ध गणेश (शिवाजी पेठ, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद कार्यालयातील लिपिक सुरेश आनंदा काळे (वय ४६, रा. शांतीनगर, उंचगाव) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कार्यालयात घुसून तोडफोड करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे या कलमांन्वये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.