कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात एका बिबट्याचा वावर मंगळवारी आढळला. एका हॉटेलमध्ये तो घुसल्याने खळबळ उडाली. ॉटेलच्या माळ्यावर, पहारेकर्यावर तसेच एका वनरक्षकावर त्याने हल्ला केला. या घटनेच्या निमित्ताने सहा वर्षांपूर्वी कोल्हापुरातील तत्कालीन खासदारांच्या घरात नववर्षाच्या पहाटे बिबट्या घुसल्याच्या प्रकाराची चर्चेला उजाळा मिळाला. कोल्हापूर पासून जवळच पश्चिम घाट आहे.
या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वाघांचा वावर आढळून आला आहे. बिबट्यांची संख्याही सह्याद्री घाटात लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये बिबट्याकडून हल्ले होण्याचे प्रकारही वरचेवर घडत असतात. तथापि आज बिबट्या कोल्हापूर शहरात घुसला. कोल्हापूर येथील उच्चभ्रू वस्ती असलेल्या ताराबाई पार्क मधील हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली.
मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या बगीच्या मध्ये उडी घेतली. त्याठिकाणी काम करत असलेल्या माळीवर हल्ला केला. यामध्ये माळी किरकोळ जखमी झाला. यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असेलल्या निखील कांबळे या युवकावरही हल्ला केला. वूडलँड हॉटेलमधून बिबट्याने बीएसएनल कार्यालयात उडी घेतली. यानंतर तो पुन्हा महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला आहे. दरम्यान त्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर याच्यावर बिबट्याने हल्ला केला.
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. आपत्ती विभाग, कोल्हापूर महापालिका अग्निशमन दल, पोलीस यांच्याकडून सहकार्य केले जात आहे.
खासदारांच्या घरी बिबट्या
दरम्यान सहा वर्षांपूर्वी ३१ डिसेंबरची रात्र संपून नव वर्षाचे स्वागत करणारे तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार व भाजपचे विद्यमान राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांच्या बंगल्यात बिबट्या घुसल्याच्या प्रकाराला आज उजाळा मिळाला. त्यांच्या घरात प्रारंभी एखादे मोठे मांजर वावरत असल्याचे काहींना दिसले होते परंतु बारकाईने पाहणी केल्यानंतर तो बिबट्या असल्याचे लक्षात आले होते. तो पहाटे सोफ्याखाली शांतपणे लपलेला दिसला होता.
या प्राण्याला पाहताच, बंगल्यात राहणारे लोक मदतीसाठी ओरडत बाहेर पळाले होते. रुईकर कॉलनी या उच्चभृभागात निवासी संकुलातील सर्वांचे लक्ष या बिबट्याने वेधून घेतले होते.
अचानक झालेल्या गोंधळामुळे घाबरून, बिबट्या बंगल्याबाहेर कंपाऊंडमधील एका छोट्याशा मोकळ्या जागेत घुसला होता. त्याने प्रमोद देसाई नावाच्या एका व्यक्तीला जखमी केले होते. बिबट्याकडून प्रतिकार सुरू झाल्याने लोक सुरक्षिततेसाठी धावत होते. नंतर, काही लोकांनी स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले. त्यांनी सापळा लावून बिबट्याला पकडले होते. घटनास्थळी स्थानिक पोलीस आले होते. त्यांनी प्रचंड गर्दीला आवर घातला होता.
बिबट्या पकडला
बिबट्याने कोल्हापूर शहरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली . त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक मोठी जाळी घेऊन आले होते. ही मोठ्या आकाराची जाळी वाहून नेत असल्याचे पाहून काहींनी समाज माध्यमातून बिबट्याला पकडले असल्याची चुकीची माहिती द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अनेकांचा बिबट्या पकडल्या गेला असा गैरसमज झाला.
मोहीम फत्ते!
परंतु वनविभागाच्या प्रयत्नामुळे आता बिबट्या खरोखरच पकडला गेला आहे. वनविभागाने त्याला पकडून नेले आहे. त्याला अधिवासात सोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.;वनविभाग , आपत्ती निवारण, महापालिका अग्निशमन, पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नाने एक मोहीम फत्ते झाली. यामुळे पेचाच सापडलेल्या कोल्हापूरकरांनी सुटकेचा विश्वास टाकला.
अद्यावत यंत्रणा
सैरावैरा धावणाऱ्या बिबट्याला पकडणे हे एक आव्हानच होते. त्यासाठी अद्यावत यंत्रणेची गरज होती. सह्याद्री वाइल्डलाइफ फाउंडेशन संस्थेने वन विभागाला ढाली, जाळी, हेल्मेटसह घातलेले संपूर्ण शरीराचे संरक्षणात्मक सूट आणि शेवटी ट्रँक्विलायझर गन हे सर्व साहित्य पुरवले. या साधनांमुळे बिबट्याला पकडणे शक्य झाले.
