कोल्हापूर : वनतारा पशुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने नांदणी जैन मठातील महादेवी हत्ती परत करण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त असले तरी तो खरेच मठात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा हत्ती खासगी व्यवस्थापन असलेल्या वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्याच्या प्रक्रियेवरच काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाला हत्तीपालनाची ७०० वर्षांची परंपरा आहे. या मठामध्ये महादेवी तथा माधुरी हा हत्ती तीन दशकांहून अधिक काळ होता. हत्तीची हेळसांड होत असल्याची तक्रार ‘पेटा’ या प्राणिमित्र संघटनेने केल्यानंतर उच्च अधिकार समितीच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाने हा हत्ती वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात यावा, असा आदेश पोलिसांना दिला. त्यावर नांदणी येथे जमावाने दगडफेक केली. अखेरीस गुजरातच्या वनतारा पशुसंग्रहालयाकडे त्याची रवानगी करण्यात आली.

त्यानंतर या पशुसंग्रहालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अंबानी उद्याोग समूहाच्या मोबाइल सेवेवर बहिष्कार टाकण्याची मोहीम गतिमान झाली. याची दखल घेऊन पशुसंग्रहालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी तातडीने कोल्हापुरात दाखल झाले.

लोकप्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी महादेवी हत्ती परत करण्याची तयारी असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांना सांगितले. तथापि हा हत्ती परत कसा येणार येथपासून ते महादेवी हत्ती हा वनतारा पशुसंग्रहालयाकडेच जाण्याच्या एकूण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजीव शेट्टी यांनी ही प्रक्रिया एक षडयंत्र असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. नांदणी मठामध्ये महादेवी हत्तीची निगा व्यवस्थित केली जात होती. पेटाच्या प्रतिनिधींनी मठाची भेट घेऊन हत्ती खासगी संग्रहालयाकडे देण्याची मागणी केली होती. त्यासाठी शाळा इमारत, वसतिगृह बांधून देण्याची तयारी दर्शवली होती. मठाने त्यास नकार दर्शवला होता. त्यानंतर हत्तीची हेळसांड होत असल्याची माहिती उपलब्ध करून उच्च अधिकार समिती समोर मांडली. या समितीने खासगी संग्रहालयाकडे हत्ती सोपवावा, अशी शिफारस केली. उच्च न्यायालयाने तसाच आदेश दिला.

राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे शासनाचे हत्ती संगोपन केंद्र आहे. शिवाय कर्नाटक,केरळ येथेही हत्ती पुनर्वसन केंद्र असताना तो नेमका ‘वनतारा’कडे सुपूर्द करण्यास सांगितले जाण्याचे कारण काय. त्यामुळेच एकूणच या प्रक्रियेवर आम्हाला संशय येत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी राष्ट्रपतींनी करावी. त्यांना असलेल्या अधिकारातून हत्ती परत दिला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे राजू शेट्टी यांचे म्हणणे आहे.