कोल्हापूर – “एचडी कुमारस्वामी यांनी एच.डी. देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे अमित शहा व जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाशी युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तथापि भाजपाशी युती ही भूमिका महाराष्ट्रातील बहुतांशी सर्व जनता दल सेक्युलर कार्यकर्त्यांना मान्य नाही, अशी भूमिका आज प्रदेश जनता दलाने घेतली आहे.

समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे जनता दलातील सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारीणी सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक पुणे येथे शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील भूमिका, धोरण व निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती या बैठकीचे निमंत्रक प्रताप होगाडे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. विलास सुरकर, श्रीमती साजिदा निहाल अहमद, मनवेल तुस्कानो, सलीम भाटी, ॲड. रेवण भोसले, ॲड. नंदेश अंबाडकर, युयुत्सु आर्ते, विठ्ठल सातव, प्रकाश लवेकर, दत्तात्रय पाकिरे यांनी जाहीर केली आहे. या बैठकीस माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा – अवयवदानातून वाचले तीन जणांचे जीव

महाराष्ट्रातील बहुतांशी कार्यकर्ते राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष या विचारसरणीमधून आलेले आहेत. हे सर्व कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष व विज्ञाननिष्ठ विचारधारेचे आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील संविधान विरोधी, लोकशाही व जनहित विरोधी, मनुवादी फॅसिझमच्या पुरस्कर्त्या धर्मांध व जातीयवादी भाजपा संघ प्रणीत राजकारणाचा, राज्य आणि केंद्र सरकारचा व अशा सर्व प्रवृत्तींचा विरोध करणे ही जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र पक्षाची व कार्यकर्त्यांची भूमिका प्रथमपासूनच होती, आजही तीच आहे आणि पुढेही तीच कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र जनता दलाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – हे गणराया, भाजपा नेत्यांना सुबुद्धी दे – खासदार सुप्रिया सुळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक राज्यातून विरोध

जनता दल सेक्युलर या पक्षाच्या घटनेमध्येच स्पष्टपणे या देशाचे संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद व वैज्ञानिक दृष्टीकोन या प्रती निष्ठा आणि त्यासाठी आवश्यक तेथे म. गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रह या मार्गाने विरोध, हे संकल्प अंतर्भूत आहेत. असे स्पष्ट असतानाही भाजपाशी युतीचा राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय हाच पक्षाच्या घटनेच्या विरोधी आहे. त्यामुळेच मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यातील पक्ष संघटनांनी देवेगौडा यांच्या या भूमिकेला स्पष्ट विरोध केला आहे. आणखी कांही राज्यांतील पक्ष संघटनाही त्याच मार्गावर आहेत, अशीही माहिती देण्यात आलेली आहे.