विधानपरिषद निवडणूक : कोल्हापुरात काँग्रेस, भाजप दोन्हींचे विजयाचे दावे

विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दयानंद लिपारे, लोकसत्ता 

कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीचा सामना रंगत असताना महाविकास आघाडी आणि भाजपाने विजयाचे दावे सुरू केले आहेत. त्या पुष्टय़र्थ मतांची आकडेवारी सादर करत प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. आकडेवारीवर कितीही जोर दिला तरी निवडणुकीच्या निकालाचे इंगित मात्र वेगळाच अर्थ दाखवणारे आहे. यामुळे दाव्यातील आकडेवारीचा बुडबुडा फुटून अपेक्षाभंग होण्याची चिन्हे आहेत.

विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रामुख्याने ही लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार, पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यात होत आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा लढतीला रंग प्राप्त झाला आहे. आघाडीतील जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, दोन्ही खासदार, ८ आमदार यांची कुमक विजयासाठी कार्यरत झाली आहे, तर भाजपाचा मुख्य भर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व महाडिक परिवार यांच्यावर आहे. सतेज पाटील यांनी उमेदवारी काँग्रेसपुरती मर्यादित न ठेवता तिला महाआघाडीचे स्वरूप दिले आहे.

भाजपानेही आपल्या मागे दोन अपक्ष आमदारांसह मित्रपक्षांचे पाठबळ असल्याचे दाखवत दंड थोपटले आहेत. यामुळे कोल्हापूरच्या आखाडय़ाला दिवसेंदिवस अधिकच चुरशीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. स्वाभाविकच महाविकास आघाडी व भाजप यांच्याकडून विजयाचे दावे केले जात आहेत. बैठका, छोटेखानी सभा, उमेदवारी अर्ज दाखल याप्रसंगी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपलाच विजय होणार असे ठामपणे सांगताना त्यासाठी आकडेवारीचे दावे सुरू केले आहेत.

संभ्रमित करणारी आकडेवारी

महाविकास आघाडी व भाजप यांना विजयाची भलतीच खात्री आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सांगितले जाणारे मतदारांच्या पाठिंब्याचे आकडे सतत बदलत आहेत. या निवडणुकीसाठी ४१७ मतदार आहेत. विजयासाठी २१८ मतदानाचा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. दोन्ही पातळय़ांवरून एकेका मतासाठी आटापिटा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर या तिन्ही मंत्र्यांनी १७० मतदार पाठीशी असल्याचा दावा केला.

तर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी त्यात आणखीन १० मतांची भर घातली. दुसऱ्या दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आघाडीपेक्षा आपले संख्याबळ अधिक असल्याचा दावा केला. त्यांनी इचलकरंजीत १६५ तर कोल्हापूर येथे १५१ मते असल्याचे सांगितले. विजयासाठी आवश्यक असणारी ४३ मतांची बेगमी केल्याचेही त्यांनी नमूद केले. गडिहग्लज नगरपालिकेतील जनता दलाच्या मित्रपक्षांनी बुधवारी सतेज पाटील यांना पाठिंबा दिला.

त्यावर सतेज पाटील यांनी आपल्याकडे १६० मते होती आता हा आकडा १७० च्या पुढे गेल्याने विजय सुकर असल्याची नवी आकडेवारी सादर केली. आकडय़ांच्या पातळीवरचा हा आलेख असा सतत बदलतो आहे. मतदान जवळ येईल तसे दाव्यांचा आकडाही उंचावत जाण्याची चिन्हे आहेत.

मताचे अर्थपूर्ण इंगित

महाविकास आघाडी असो की भाजप दोघांना निवडणूक जिंकण्याचा कमालीचा आत्मविश्वास आहे. त्यासाठी पुरेशा मतदारांशी संपर्क साधला असल्याचे आवर्जून सांगितले जात आहे. मतदारांच्या पातळीवरचे चित्र वेगळेच दिसत आहे. ‘‘आम्ही कोणत्या पक्षाकडून, नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडून आलो याला फारसे महत्त्व नाही. मतदान हवे असेल तर थेट आमच्याशी संपर्क साधावा’’, असा सांगावा मतदारांनी थेट उमेदवारांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत काही नेत्यांनी आपल्याकडे अमुक इतकी मते आहेत, असे सांगून मधल्यामध्ये डल्ला मारला होता. ही बाब मतदारांच्या जिव्हारी लागली असल्याने जी काही चर्चा करायची ती आणि त्याचा कृपाप्रसाद विनामध्यस्थ आमच्यापर्यंत पोहचला पाहिजे, अशी उघड चर्चा सुरू केली आहे. त्यातील ‘मथितार्थ’ उलगडल्याने उमेदवारांसह त्यांच्या नजीकच्या निकटवर्तीयांकडून ‘लाखमोला’च्या मतदारांची साथ मिळवण्याचा जोरकस प्रयत्न सुरू झाला आहे. मतदार सहलीवर रवाना होऊ लागले आहेत. त्यांना तशी जाहीर सभेतच ऑफर दिली जात आहे. प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक मते असल्याचा दावा करून निवडणूक जिंकता येत नाही याची अंर्तमनाशी खूणगाठ बांधून प्रत्यक्ष मतदारच आपल्या समूहात जोडण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी सुरू आहे. त्याचे मोल पाहता निवडणूक चुरशीची न बनेल तर नवल. कोटींचा कोटी उड्डाणामुळे निकाल अधिक उत्सुकतापूर्ण राहणार असे संकेत मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra mlc election congress bjp claim victory in kolhapur zws

Next Story
कोल्हापूरमध्ये पर्यटनवाढीला संधी ; जिल्ह्य़ात ३० स्थळे निश्चित करून लवकरच आराखडा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी