कोल्हापूर जिल्ह्य़ातील भाजपाचा युवा चेहरा अशी प्रतिमा असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्याकडे म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्षपद सोपवून भाजपाने पक्ष गृहबांधणीवर नजर ठेवली आहे. या माध्यमातून भाजपाने जिल्’ाात बेरजेच्या राजकारणात आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रथम संभाजीराजे व त्यानंतर चार महिन्यानंतर समरजितसिंह घाटगे हे राजर्षी शाहूंचे दोन्ही वंशज पक्षाच्या तंबूत आणून भाजपाने कोल्हापूर जिल्’ाातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज, मराठा आरक्षण, शेतकरी, ऊस उत्पादक, तरुण अशा अनेक मुद्यांना कवेत घेऊन पक्षाची बांधणी तळागाळात अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
कागल तालुक्यात माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांचे नेहमीच वलय राहिले. त्यांनी स्थापन केलेला श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना हा सहकारी साखर कारखानदारीतील यशस्वितेचा मानदंड मानला जातो. त्यांच्या पश्चात या कारखान्याची जबाबदारी त्यांचे पुत्र समरजिंतसिंह घाटगे यांच्याकडे आली. त्यांच्यातील नेतृत्व व वक्तृत्व गुण याची पारख पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यांना पक्षात आणण्याच्या दृष्टीने पावले टाकली.




विक्रमसिंह घाटगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कागल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती लावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समरजितसिंह घाटगे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविणार असल्याचे सूतोवाच केले होते. स्वाभाविकच ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात वर्षां बंगल्यावर फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश समारंभ पार पडला, तेव्हाच त्यांना म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला होता.
सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब होऊन घाटगे घराण्याला ‘लाल दिवा’ प्रथमच मिळाला आहे. विक्रमसिंहराजे यांनी अवघे आयुष्यभर सकारात्मक राजकारण करूनही त्यांना लालदिव्याची प्रतिष्ठा प्राप्त झाली नव्हती , पण समरजितसिंह यांनी पहिल्याच पावलात अन तेही वयाच्या ३४ व्या वर्षी ही किमया करून दाखवली आहे.
राजर्षी शाहू महाराज हे मूळचे कागलच्या घाटगे घराण्यातील. समरजितसिंह हे त्यांचे वंशज. तर संभाजीराजे हे शाहूंच्या गादीचे वारसदार. शाहूंच्या अशा दोन्ही घराण्यातील युवा नेतृत्वास भाजपामध्ये आणून पक्षाने आपला राजकीय पट अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. या दोघांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मार्गी लावण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
विधानसभेचे गणित
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्य़ात थेट व प्रखरपणे विरोध करण्यात आघाडीवर असतात ते कागलचे आमदार हसन मुश्रीफ. आपल्याला आव्हान देणाऱ्या मुश्रीफांना नेस्तनाबूत करणे हे पाटील यांचे ध्येय असून त्यासाठी त्यांनी समरजितसिंह यांचा खुबीने वापर करण्याचे ठरविले आहे. कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीत समरजितसिंह यांना ‘कमळ’ चिन्हावर लढण्यास भाग पाडण्यात आले. तेथे त्यांना नऊ जागांवर विजय मिळाला. जिल्हा परिषदेत यशाने हुलकावणी दिली. पण या दोन्ही निवडणुकांत घाटगे हे ४० हजार मते कमळ चिन्हावर घेण्यात यशस्वी ठरले. हीच बाब त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी लाभदायक ठरू शकते असा होरा भाजपाच्या धुरिणांनी बांधला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ विरोधात घाटगे यांना उतरवून मुश्रीफ यांची राजकीय कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.