शिरोळ तालुक्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमावेळी वृत्त छायाचित्रकार राज मकानदार याला सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अंगरक्षक दीपक खोत याने शनिवारी मारहाण केली. यावरून मंत्री पाटील यांनी पोलीस खात्यातील खोत यास चांगलेच झापले, तर मकानदार यांच्याशी बोलताना झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, याबाबत कोल्हापूर प्रेस क्लबची बठक होऊन सोमवारी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन संबंधित अंगरक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
गुरुदत्त साखर कारखाना येथे मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री पाटील व अन्य निमंत्रित भोजन करत होते. त्यावेळी मकानदार यांनी छायाचित्र काढले. त्यावरून पोलीस अंगरक्षक दीपक खोत याने मकानदार यांच्याशी हुज्जत घातली. हा वाद तिथेच थांबला. मकानदार व खोत हे दोघेही समोरासमोर जेवत होते. नजरानजर झाल्याने खोत याने थेट मकानदार यांना मारहाण केली. हे पाहून जेवणाच्या ताटावरून उठून मंत्री पाटील यांनी दोघांना अलग केले. मंत्री पाटील यांनी खोत यास चांगलेच खडसावले, तर मकानदार यांच्याशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. या प्रकाराचा पत्रकारांनी निषेध नोंदवला आहे. मकानदार यांना कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्याची सूचना कोल्हापूर प्रेस क्लबच्या बठकीत करण्यात आली.