अपहरण करून सुटकेसाठी ८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश पवन घोरपडे (वय ३०, रा. आर. पी. रोड) याला बुधवारी इचलकरंजी येथील न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. प्रदीप देशपांडे यांच्या आदेशनंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अपहृत तरुण नीलेश ऊर्फ गोपी दगडू धुमाळ याचा भाऊ संतोष धुमाळ (वय ३१, रा. वीरशैव बँकेच्या मागे) याने फिर्याद दिली आहे.
बेपत्ता नीलेश धुमाळ (वय २५) याला परत घेऊन येतो, असे सांगून घोरपडे याने धुमाळ कुटुंबीयांकडून पसे उकळले आहेत. घोरपडे याच्या धमकीमुळे दहशतीखाली वावरत असलेल्या कुटुंबाने पोलीस अधीक्षक देशपांडे यांची भेट घेऊन तक्रार दिली. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना संशयिताला ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
इचलकरंजी येथील मध्यवर्ती चौकातील वीरशैव बँकेजवळील भवानी मेटल या भांडी विक्री दुकानाचा मालक नीलेश ऊर्फ गोपी धुमाळ हा ३ मार्च रोजी बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी त्याचा कोल्हापूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर, कुरूंदवाड, सातारा, बेळगाव व गोवा परिसरात शोध घेतला. पण तो मिळून आला नाही. त्यामुळे ५ मार्च रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वडील दगडू विष्णू धुमाळ (वय ५५) यांनी तो बेपत्ता असल्याची नोंद केली.
संतोष धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत नीलेश बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू असतानाच त्यांच्याशी गडमुडिशगी (ता. करवीर) येथील ऋषिकेश घोरपडे याने संपर्क साधला. २४ मे रोजी त्याने नीलेशची भेट घडवून आणण्यासाठी ८ लाख ५० हजारांची रक्कम मला द्यावी लागेल, असे सांगितले. या घटनेची कोठेही वाच्यता केल्यास त्याचे परिणामही नीलेशवर होऊ शकतात, असेही त्याने बजावले. कुटुंबीयाने ऋषिकेशला आठ लाख रुपये व चारचाकी वाहनही दिले.
पण त्यानंतर ऋषिकेश काही दिवस गायब झाला. ५ जुल ऋषिकेश याने धुमाळ कुटुंबीयांना गडमुडिशगी येथे बोलावून आपणास बेदम मारहाण करून आठ लाखांची रक्कम हिसकावून घेतल्याचे सांगितले. नीलेश व आठ लाखांच्या रकमेविषयी माझ्याकडे अजिबात विचारणा केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. स्वत:च्या मुलाला कायमचे मुकाल, अशी धमकीही त्याने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. धुमाळ हा बेपत्ता होऊन पाच महिने लोटले तरी त्याचा शोध लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत असताना पोलिसांसमोर त्याच्या तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना जाग आली आहे.