बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर बँक पुन्हा उभारी घेत नाही हा समज खोटा पाडत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षभरात ठेव संकलन, कर्जवाटप, नफा, भागभांडवल अशा सर्वच पातळय़ांवर लक्षवेधी कामगिरी केली आहे. दहा महिन्यांपूर्वी संचालक मंडळ सत्तेवर आले तेव्हा २४०० कोटी ठेवी होत्या. मार्चअखेर विविध संस्था, सभासद, उद्योजक यांनी बँकेवर विश्वास व्यक्त करीत तब्बल ८७१ कोटीच्या ठेवी दिल्याने त्या आता ३२७१ कोटी रुपये झाल्या आहेत. तर गत पाच वर्षांतील सर्वाधिक २८ कोटी ६४ लाख रुपये नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. त्यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुका होऊन मे २०१५मध्ये नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले. दहा महिन्यांच्या अवधीत बँकेने सर्वच स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. गतवर्षी कर्जवाटप २१६६ कोटी रुपये होते. ते आता २४५० कोटीपर्यंत पोहोचले आहे. १०३१ कोटी रुपये असणारा संचित तोटा ७४५ कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे. एकरकमी कर्जफेड योजनेत ३४ संस्थांनी भाग घेतला. तर अवसायनातील संस्थांकडे असणारे ३४ कोटी कर्जापकी १२ कोटी कर्ज वसूल झाले आहे. तर अशा २० संस्थांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
आगामी वर्षांच्या मार्चअखेपर्यंत ठेव संकलन पाच हजार कोटी रुपये, एनपीए ३ टक्के, संचित तोटा निरंक करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील वर्षी लाभांश देण्यात येणार आहे. रुपे या डेबिट कार्डचा वापर करण्याचे बँकेने ठरवले असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाबार्डचे माजी अध्यक्ष सुभाष थोरात यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ केशवराव भोसले नाटय़गृहात होणार आहे. व्यावसायिक बँकांप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज व्हावे असे नियोजन केले, त्यासाठी प्रशासनाला उद्युक्त केले. परिणामी, प्रति कर्मचारी व्यवसाय ३.१९ कोटीवरून ३.७६ कोटीपर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता कारवाई करण्यात आलेले संचालक मंडळही पारदर्शकपणे कारभार करू लागले तर संस्थेचे कामकाज उठावशीर होते हे सिद्ध झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संचालक मंडळाला विश्वास देतानाच पाठीवर शाबासकीची थाप द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत मुश्रीफ यांनी पुढील वर्षी राज्यातील प्रथम क्रमांकाची जिल्हा बँक बनवण्याचा मनोदय व्यक्त केला.
‘एफआरपी’साठी कारखान्यांना अर्थसाहाय्य
सध्या गाजत असलेल्या उर्वरित २० टक्के एफआरपीच्या रकमेबाबत मुश्रीफ म्हणाले, पुणे येथे साखर आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बठकीत ठरल्यानुसार मे महिन्यापासून ही रक्कम साखर कारखाने देणार आहेत. मात्र हा निर्णय होताच साखरेचे दर शंभर रुपयांनी घसरले आहेत. एफआरपी भागविण्यासाठी सर्वच कारखाने एकदम साखर विक्री करू लागले तर साखरेचे भाव आणखी घसरण्याचा धोका आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज पुरवठा केलेल्या साखर कारखान्यांनी बँकेकडे ठेवलेली दहा टक्के मार्जनि मनीची रक्कम पुन्हा कर्ज स्वरूपात देण्याचे नियोजन केले असून, सोमवारी होणा-या बँकेच्या बठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे. आमच्या बँकेप्रमाणेच राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेसह सर्वच जिल्हा मध्यवर्ती बँकांनी हा पर्याय अंगीकारावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ठेवी सव्वातीन हजार कोटींवर
संचालक मंडळ बरखास्तीनंतरची प्रगती
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-04-2016 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than three thousand crore deposits of kolhapur district bank