मराठय़ांना आरक्षण देणे गरजे आहे. मात्र ते गरजूंपर्यंत पोहोचणार का हा खरा प्रश्न आहे. अन्यथा आरक्षणाचा फायदा उठवणारा प्रस्थापित, धनधांडग्यांचा नवा वर्ग तयार होऊन गरजूंना पुन्हा उपेक्षितांचे जिणे येऊ नये, अशी भीती ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात योग्य तो बदल झाला पाहिजे. मात्र या बदल प्रक्रियेत लोकसंवाद आणि विश्वास संपादनाची प्रक्रिया महत्त्वाची आहे, असेही मतही त्यांनी व्यक्त केले.

एन. डी. पाटील म्हणाले, की मराठा समाजाने आरक्षण मागणे आक्षेपार्ह नाही. पण हा लाभ कोण घेणार हा खरा प्रश्न आहे. तो कटाक्षाने समाजातील वंचितांनाच मिळाला पाहिजे. उद्या जर याचा लाभही समाजातील प्रस्थापित मराठा वर्ग घेऊ लागला तर ही या आंदोलनाची शोकांतिका ठरेल. या समाजात शेतमजूरही आहे आणि छत्रपतीदेखील. यामुळे त्याचा फायदा कोण घेते आहे, याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यातही योग्य तो बदल झाला पाहिजे, असेही मत पाटील यांनी व्यक्त केले. फक्त या बदल प्रक्रियेत लोकसंवाद आणि विश्वास संपादनाची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.