कोल्हापूर : साडेतीनशक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवास उद्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिर आकर्षक रोषणाई मुळे उजळून निघाले आहे. भाविकांच्या स्वागतासाठी करवीर नगरी आणि मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेमुळे गतवर्षी देवीचे मंदिर बंद होते. यंदा करोना नियमांचे पालन करीत तब्बल सहा महिन्यांच्या कालावधी नंतर मंदिर खुले होणार असल्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्सवातील परंपरेनुसार सकाळी मंदिरामध्ये तोफेची सलामी दिली जाईल. त्यानंतर गाभाऱ्यामध्ये घटस्थापना विधी होईल. दुपारनंतर विशेष पूजा बांधली जाणार आहे. रात्री देवीचा पालखी सोहळा मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अंबाबाईचे श्रीपूजक मंडळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या सर्वांचीच उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.
तासात ४ हजार नोंदणी
शासनाने ऑनलाईन बुकिंगच्या साह्याने दर्शन व्यवस्था केली असल्याने बुधवारी सकाळपासूनच हजारो भक्त आरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पहिल्याच तासात चार हजार भाविकांनी नोंद केली. ते पाहता भाविकांमुळे मंदिरात दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
शहर सुसज्ज
घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे पुन्हा खुली होत आहेत. त्यामुळे देशभरातील भाविक, पर्यटक कोल्हापुरात येणार असून, त्यांच्या स्वागतासाठी अख्खी करवीर नगरीच सज्ज झाली आहे. भक्तनिवास, हॉटेल्स, पर्यटन स्थळे सुसज्ज झाली आहेत. दर्शन रांग, वाहनतळ आणि अन्य व्यवस्था सक्षम करण्यात आली आहेत, असे देवस्थान व्यवस्थापन शिवराज नायकवडे यांनी बुधवारी सांगितले.