कोल्हापूर: विधिमंडळाला चोरमंडळ असे संबोधून वाद ओढवून घेणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आपल्या भूमिकेचा गुरुवारी पुनरुच्चार केला. चोरमंडळ या माझ्या वक्तव्यावर मी ठाम असून कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
राऊत दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल कोल्हापुरात पाऊल ठेवल्यावर लगेचच विधिमंडळाला चोरमंडळ असे म्हटले. त्यांच्या या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने या विधानावर मते व्यक्त केली. याबद्दल राऊत यांच्यावर हक्कभंग ठराव दाखल करण्याच्या हालचाली सत्ताधारी गटाने सुरू केल्या आहेत. मात्र यानंतरही खासदार राऊत यांचा टीकेचा पवित्रा कायम राहिला. ‘‘मी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटले ते बरोबरच आहे आणि मी आजही त्यावर ठाम आहे.
पण मी हे तिथे बसलेल्या अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांना म्हटले आहे. हे लोक दरोडेखोर आहेत. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही राजकीय दृष्टय़ा पाहणार असाल तर मी लक्ष देणार नाही. मला मुंबईत घरी आणि कार्यालयात नोटीस आली आहे. मात्र मी अद्याप ती वाचली नाही’’, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, निवडणूक आयोग सरकारच्या हातातले बाहुले बनले आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा काय करणार? याच निवडणूक आयोगाने हेतूपुरस्पर शिवसेना दुसऱ्याच्या ताब्यात दिली. राज्यात यापुढे कोणतीही निवडणूक होऊ दे, नकली शिवसेनेचा प्रभाव कोठेच दिसणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.