बहुमजली इमारत बांधणार
पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथील १०० वर्षांपूर्वीची शाहूकालीन ५१८ जुनी निवासस्थाने पाडून त्याठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळातर्फे बहुमजली इमारत बांधकामाबाबतची प्रशासकीय कारवाई सुरु आहे. पोलिसांची निवासस्थाने अत्यंत दयनीय स्थितीत असून ही स्थिती सुधारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १४०० निवासस्थानांचा समावेश असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पोलिसांच्या निवासस्थानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आढावा घेतला असून प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात पोलीस क्वार्टर्समध्ये जाऊन भेट द्यावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांनी पोलीस मुख्यालयातील निवासस्थानांमध्ये भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. या वेळी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एस.साळुंखे, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, नगरसेविका स्वाती यवलुजे, पोलीस उप अधीक्षक (गृह) सतिश माने, पोलीस उप अधीक्षक भरतकुमार राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर येथील बांधकामे पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असून तोपर्यंत सध्या असलेल्या क्वार्टर्समध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शौचालय, सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, रंगरंगोटी यांच्या दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तसेच १९८६ मध्ये बांधलेल्या निवासस्थानांच्या मेंटेनन्ससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या सूचनेनुसार प्रस्ताव तयार केले आहेत. हे प्रस्ताव आपण स्वत: मंत्रालयस्तरावर घेऊन जाणार असून यासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करुन देणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलांतर्गत सध्या पोलीस मुख्यालय, कोल्हापूर ७१८ यामध्ये जुनी शाहूकालीन ५१८ व १९८६ साली बांधलेली २००, लक्ष्मीपुरी पोलीस लाईन ६०, रिसाला पोलीस लाईन, कसबा बावडा ५१, जुना बुधवार पोलीस लाईन ८४ अशी ९१३ निवासस्थाने उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण कल्याण महामंडळामार्फत ११३९ निवासस्थानांना मंजुरी प्राप्त झालेली आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले , आतापर्यंत पोलिसांना १८० चौ. फुटाची निवासस्थाने होती. ती आता ४३० चौ.फुटाची होतील. जिल्हा मुख्यालयातील जुनी ५१८ निवासस्थाने पाडून टप्प्याटप्प्याने टॉवर उभे केले जातील. १९८६ मधील २०० निवासस्थाने न पाडता त्यांच्यात सुधारणा केली जाईल. प्रास्ताविक पोलीस उप अधीक्षक (गृह) सतिश माने यांनी केले.