कबनूर येथे दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. संदीप परशराम कोरवी (वय २६) असे त्याचे नाव आहे. हा अपघात ६ मार्च रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास झाला असून, अज्ञात वाहनाने धडक दिल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २० तास उलटूनही नोंद झाली नसल्याने नेमके कारण समजू शकले नाही.
हातकणंगले तालुक्यातील रुई येथे म्हसोबा माळावर राहणारा संदीप परशराम कोरवी हा ६ मार्च रोजी ( एम.एच. ०९- सी.टी. ५०६९) या मोटारसायकलवरून इचलकरंजी येथे कामानिमित्त आला होता. काम संपल्यावर रात्री घरी परतत असताना कोल्हापूर रोडवरील पंचगंगा पाण्याच्या टाकीजवळ गंभीर जखमी अवस्थेत तो नागरिकांना आढळून आला. शेजारीच त्याची मोटारसायकल होती. डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाल्याचे पाहून नागरिकांनी त्याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, घटनास्थळी अज्ञात वाहनाने ठोकरल्याने अपघात झाल्याची चर्चा सुरू होती.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2016 रोजी प्रकाशित
दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू
अज्ञात वाहनाने धडक दिल्याची शक्यता
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-03-2016 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One death in bike accident