कोल्हापूर महापालिका हद्दवाढीचा अनुकूल शिफारशींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठवला असताना लगेचच हद्दवाढीत समाविष्ट होणा-या गावांनी विरोधाचे हत्यार उपसले आहे. हद्दवाढीतून शिरोली गाव वगळावे आणि स्वतंत्र नगरपालिकेस मंजुरी द्यावी, या मागणीसाठी शिरोली शुक्रवारपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीत झालेल्या सर्वपक्षीय बठकीत घेण्यात आला. बैठकीस खासदार राजू शेट्टी, आमदार अमल महाडिक व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यावर टीका करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण म्हणाले,की महापालिकेच्या हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव जिल्हा अधिकारी अमित सनी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीने राज्य शासनाकडे पाठविला आहे; पण हद्दवाढीत समावेश करणा-या १९ गावांचे म्हणणेही जाणून घ्यायला पाहिजे होते. एकतर्फी महापालिकेच्या बाजूने हा प्रस्ताव पाठविला आहे. आमच्या गावांचा स्वतंत्र नगरपालिकेचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात आहे. आम्हाला नगरपालिका पाहिजे, त्यासाठीच जोपर्यंत हद्दवाढीतून गावाचे नाव काढले जात नाही, तोपर्यंत शिरोली गावातील सर्व व्यवहार बेमुदत बंद राहतील.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले,की खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि आमदार अमल महाडिक यांना कोणीही भेटायला जायचे नाही. या नेतेमंडळींनी आजपर्यंत शिरोलीकरांना फक्त पोकळ आश्वासने दिली आहेत, त्यांनी नगरपालिका मंजूर करायला हवी होती; पण सर्व नेत्यांनी शिरोलीकरांना फसविले आहे.
ग्रामपंचायत सदस्य गोिवद घाटगे म्हणाले,की सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हद्दवाढ हाणून पाडू या. बठकीस उपसरपंच राजू चौगुले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, महेश चव्हाण, शिवाजी खवरे, अनिल खवरे, आणि नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग रोखणार
शिरोली येथे प्रत्येक शनिवारी भरणारा आठवडी बाजार या शनिवारी भरणार नाही. तसेच गावातील सर्व व्यवहार बेमुदत बंद राहतील. या बंदमध्ये सर्वानी सहभागी होऊन आंदोलनाला पािठबा द्यावा, असे उपसरपंच राजू चौगुले म्हणाले. सोमवारी गावातील नागरिक सहकुटुंब आणि जनावरांसह पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा निर्णय बैठकीत झाला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2016 रोजी प्रकाशित
हद्दवाढीत समाविष्ट गावांचे विरोधाचे हत्यार
गावांमधून ‘बंद’ आंदोलन सुरू
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-02-2016 at 03:45 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition of included villages in limit increase