देशात शेतक-यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतकरी कधीही कर्ज बुडवून पळून जात नाही. ठराविक उद्योगपतींना सरकारने १ लाख १४ हजार कोटींची कर्जे माफ केली आहेत. आता केंद्राने त्वरित शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी बुधवारी लोकसभेत बोलताना केली.
शेट्टी म्हणाले, की देशात गेल्या २० वर्षांत ३ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. या आव्हानाला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. कारण देशातील शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत आहे. सरकारने शेतक-यांना देण्यात येणाऱ्या कृषी कर्जात वाढ केली आहे, मात्र शेतकरी त्या कर्जाची परतफेड कशी करेल, याची तरतदू केली गेली नाही. जर शेतक-यांचे उत्पन्न येत्या ५ वर्षांत दुप्पट करायचे असेल, तर त्यांचा उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. पिकांच्या हमीभावात वाढ केली गेली पाहिजे. हमीभावात वाढ करता आले नाहीतर उत्पादन खर्च कमी करून त्यांना पायाभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर शीतगृहे, वेअर हाऊस, रस्ते, पाणी, सिंचन योजना याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे.
देशातील मोजक्या उद्योगपतींनी मिळून १ लाख १४ हजार कोटी रुपयांची कर्जे बुडवली आहेत. शेतक-यांना सरकार मदत करू इच्छित असेल तर शेतक-यांना पुन्हा एकदा कर्जमाफी दिली गेली पाहिजे. देशातील बँकांना २५ हजार कोटींची मदत सरकार देत आहे, शेतकरी कर्जमाफीचा हक्कदार का नाही? तसेच गावातील एका म्हशीची किंमत जवळपास १ लाख आहे आणि गरीब मजुरांना विमा साहाय्य म्हणून केवळ १ लाखाची विमा सुरक्षा दिली आहे. त्यात वाढ करून ५ लाख रुपये विमा सुरक्षा करण्यात यावी अशी मागणीदेखील शेट्टी यांनी केली.