संरक्षण भिंती, शेडला तडे
शहरातील प्रतिष्ठित बांधकाम म्हणून चच्रेत असलेल्या विश्वकर्मा गृहनिर्माण प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीस तडे जाऊन धोका निर्माण झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन संरक्षण भिंती व शेडच्या धोकादायक भागाचे बांधकाम तातडीने काढून लेखी आदेश दिला आहे. त्याची दखल घेऊन संबंधितांनी धोकादायक बांधकामाचा भाग व शेड हटवले आहे. पंचगंगा नदीच्या पुराचे साचलेले पाणी ओसरू लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
खानविलकर पेट्रोल पंपाजवळ विश्वकर्मा गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.ई वॉर्डमधील रि.स.नं. १०३/३ पकी येथील मिळकतीवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून रीतसर रेखांकन मंजुरी देण्यात आली आहे. ही मिळकत रेडझोनमध्ये व नाल्यालगत असल्याने याबाबत रेडझोन नियमावलीतील तरतुदी व कोल्हापूर शहरास शासन मंजूर नियंत्रण नियमावलीतील नियम क्र. ४३ (ब) मधील तरतुदी विचारात घेऊन बांधकाम परवानगी झालेली आहे. या मिळकतीच्या दक्षिणेकडील नाल्यालगत विकसकाने संरक्षण भिंत व शेड बांधली आहे. नाल्यातील पुराच्या पाण्यामुळे विश्वकर्मा गृहनिर्माण प्रकल्प संरक्षण भिंतीचे पाइल फाऊंडेशनलगतची माती वाहून गेली असल्याने संरक्षण भिंतीला धोका निर्माण झालेला आहे. या लगतची माती वाहून गेलेली आहे. ही बाब ही नसगिक आपत्तीमुळे घडली असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
याबाबत माहिती प्राप्त झाल्यावर प्रत्यक्ष जागेवर जाऊन घटनास्थळी निरीक्षण करण्यात आले. या प्रकल्पाचे आíकटेक्ट संभाजी पाटील, स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रणव कुलकर्णी, नगररचना विभागाकडील नारायण भोसले, उपशहर रचनाकार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या जागेवर कोणतीही क्षती, धोका पोहोचू नये याबाबत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्या निरीक्षणाखाली तातडीने उपाययोजना करण्याबाबत तसेच कोणतीही हानी होऊ नये म्हणून धोकादायक भागाचे बांधकाम तातडीने काढून घेण्याबाबत लेखी आदेश बजावला आहे.
