गावठी कट्टे (पिस्तूल) बाळगणाऱ्या इचलकरंजी व कोल्हापूर येथील दोघांना मंगळवारी इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. द्वारकाध जयनारायण खंडेलवाल (वय २६, रा. भोनेमाळ) व प्रतीक सुहास सरनाईक (वय २५, रा. आरकेनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन गावठे कट्टे, तीन जिवंत राऊंड व एक रिकामी पुंगळी असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भोनेमाळ परिसरात राहणारा द्वारकाधिश खंडेलवाल हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर खंडणी, मारामारी, चोरी आदी गुन्हे दाखल असून त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले होते. खंडेलवाल याला शिवाजीनगर पोलिसांनी पुन्हा शहरातील जुने बसस्थानक परिसरात ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्याकडे आणखीन काही कट्टे असल्याचे निष्पन्न झाले. द्वारकाधिश याच्याकडून दोन कट्टे व जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. अधिक चौकशी होऊन त्याचा साथीदार प्रतीक सरनाईक याच्याकडूनही पोलिसांनी एक गावठी कट्टा, राऊंड व रिकामी पुंगळी जप्त केली आहे.
गावठी कट्टय़ाची चाचणी घेतली असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून एक राऊंड त्यांनी झाडावर वापरला आहे, ही माहिती पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली. आगामी गणेशोत्सव व नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस खाते दक्ष झाले असून गुन्हेगारांच्या विरोधात तीव्र मोहीम सुरू असल्याचे नरळे यांनी सांगितले. खंडेलवाल व सरनाईक यांनी गावठी कट्टे कोठून आणले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या दोघांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले.