येथील गजबजलेल्या गुजरी पेठेतील सिंमदर ज्वेलर्स या दुकानावर भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या पिंटू जयसिंग राठोड (वय २५), पुनमसिंग मानसिंग देवरा (२१) व केतनकुमार गणेशराम परमार (सर्व रा.नुन, राजस्थान) या तिघांना सोमवारी पोलीसांनी ताब्यात घेतले. २६ जानेवारीला या तिघांनी भर दिवसा दरोडा टाकून १५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यानंतर ते फरार झाले होते.

हेही वाचा >>> कोल्हापूरातील प्राथमिक शाळेतील १७ विद्यार्थी इस्त्रोला रवाना

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपास पथके तयार केली. गुजरीत सराफ व्यावसायिकाच्याकडे कारागीर असणारे काहीजण राजस्थान आणि प.बंगाल येथील असल्याची माहिती मिळाली.  काही पथके राजस्थानला तपासकामी पाठविले होते. तेंव्हा हा गुन्हा पिंटू राठोड याने आपल्या साथीदाराच्या मदतीने केला होता. चोरी करून ते पुणे – बेळगाव मार्गावर असलेल्या हॉटेल निलकमल येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी येथे ठिकाणी सापळा रचून तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी बनावट किल्ल्या तयार करून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कडील चोरीस गेलेला १५  लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना पुढ़ील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक महेद्र पंडीत यांनी या पथकाचे अभिनंदन केले असून ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ ,उपनिरिक्षक संदीप जाधव ,शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.