scorecardresearch

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय खडाखडी सुरू

राज्यातील सत्तेने कूस पालटल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात तिघांकडे मंत्रीपद आले आहे. यामुळे शिंदे – भाजप युतीची ताकद वाढली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय खडाखडी सुरू
प्रतिनिधीक छायाचित्र

दयानंद लिपारे

 कोल्हापूर : राज्यातील सत्तेने कूस पालटल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात तिघांकडे मंत्रीपद आले आहे. यामुळे शिंदे – भाजप युतीची ताकद वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस -राष्ट्रवादीचा बालेकिल्ला या समीकरणाला आता कडवे आव्हान मिळाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये कोणाची राजकीय ताकद अधिकारी याचा प्रत्यय येणार असून आतापासूनच आखाडय़ात खडाखडी सुरू राहिली आहे.

 राज्याच्या स्थापनेपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले. पुढे शेकाप, जनता दल, शिवसेना, भाजप या विरोधी पक्षांची ताकद वाढत गेली. पण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थान भक्कमपणे टिकून राहिले. राष्ट्रवादीच्या उदयानंतर पश्चिम महाराष्ट्रात घडय़ाळाची टिकटिक वाढत राहिली.

अलीकडच्या काळात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रभुत्वाला विरोधकांकडून आव्हान मिळू लागले आहे. उभय काँग्रेसचे एक-एक लोकसभा, विधानसभा मतदारसंघ हळूहळू करीत शिवसेना झ्र् भाजपच्या ताब्यात गेले. तर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतरही त्यांना पश्चिम महाराष्ट्र तुम्ही चांगलीच ताकद मिळाली आहे. २ खासदार व ७ आमदारांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करीत शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. या भागात अंकुरत चाललेल्या शिवसेनेला हा जबर धक्का बसला. नव्या बदललेल्या समीकरणांनुसार एकनाथ शिंदे – भाजप यांचे नवे राजकीय पर्व सुरू झाले आहे. तर आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला निकराने लढा द्यावा लागणार आहे. या नव्या लढतीतली एक बदल म्हणजे पूर्वी भाजपसोबत असणारी शिवसेना आता आघाडीचा एक भाग बनलेली असेल.

 तुल्यबळ नेत्यांमध्ये सामना

शिंदे- भाजप गटाने पश्चिम महाराष्ट्रात आपला राजकीय विस्तार करण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, शंभूराजे देसाई या मंत्र्यांसह विजयसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, धनंजय महाडिक यांच्यासह भाजपला पाठिंबा दिलेले प्रकाश आवाडे व विनय कोरे अशा सगळय़ा प्रभावशाली नेत्यांची फौज आहे. शिंदे भाजप गटाचा वाढता प्रभाव रोखून पश्चिम महाराष्ट्रातील उभय काँग्रेस आणि शिवसेनेला स्थान टिकवणे हे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, श्रीनिवास पाटील, प्रणिती शिंदे तसेच हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील हे माजी मंत्री यांच्यावर किल्ला अभेद्य ठेवण्याचे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीला पाच जिल्ह्याचा राष्ट्रीय पक्ष म्हणून हिणवले जाते. या पक्षाची खरी ताकद पश्चिम महारष्ट्रात असल्याने येथील संख्याबळ वाढवण्यावर शरद पवार यांची रणनीती आहे. तर, मुळचे सातारा जिल्ह्यातील असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांचे मनसुभे उधळण्याच्या तयारीत आहत. परिणामी, राज्यपातळीवरील नेत्यांच्या नजरेतही पश्चिम महाराष्ट्राला विशेष महत्त्व आले आहे. सहकार झ्र् साखरेचा समृद्ध पट्टा असलेल्या सह्याद्रीच्या या खोऱ्यात राज्यातील नवे सत्ताधारी आणि मावळते सत्ताधारी या दोन्हीकडे प्रभावी नेत्यांचा भरणा आहे. दोघांनीही येथील जनमत आपल्या बाजूने असल्याचा दावा केला आहे. तथापि, कोणाची ताकद नेमकी किती याचा प्रत्यय आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकीत येणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील रणसंग्राम अत्यंत चुरशीचा ठरणार याचे संकेत मिळत आहेत.

दोन्हीकडे प्रभावी नेते

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. त्यातून कोल्हापूरला उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीला समाज कल्याण मंत्री सुरेश खाडे, तर साताऱ्याला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई अशी तीन मंत्रीपदे आली. या तिघांसह कोल्हापूर तीन खासदार, सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, सातारा जिल्ह्यातील एक खासदार त्यांच्यासोबत असणार आहे. आमदारांची संख्याही लक्षणीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन, सांगली जिल्ह्यातील तीन आमदार, सोलापूर पाच आमदार, सातारा जिल्ह्यातील चार आमदार असे लोकप्रतिनिधींचे मोठे संख्याबळ त्यांच्याकडे एकवटले आहे. तुलनेने महाविकास आघाडीकडे कोल्हापूर सांगली व सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी पाच आमदार, सातारा जिल्ह्यात चार आमदार असे निर्वाचित लोकप्रतिनिधींची कुमक आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Political maharashtra bjp alliance nationalist elections political ysh