कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी सकारात्मक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सोमवारी येथे केले.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या विनंतीनुसार आज येथील चित्रनगरीला भेट दिली. या ठिकाणी उपलब्ध सुविधा, सेट यांची माहिती घेतली. अष्टविनायक मिडियाचे संग्राम पाटील, डॉ. महादेव नरके, मोरेवाडीचे सरपंच ए.व्ही. कांबळे आदी उपस्थित होते.
चित्रनगरीमध्ये आपल्या एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण केले जावे. यामुळे स्थानिक कलाकारांना संधी, लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोल्हापूर चित्रनगरीचा लौकिक वाढीस लागेल,अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली. त्याला गोवारीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. चित्रपट सृष्टीसाठी कोल्हापूरने दिलेल्या योगदानाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
चित्रनगरीच्या प्रतिमेसाठी
चित्रनगरीचे व्यवस्थापक दिलीप भांदीगरे यांनी लोकेशन, सुविधांची सविस्तर माहिती दिली. चित्रपट सृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरातील चित्रनगरीमध्ये अशा प्रकारच्या सर्व गोष्टी पाहून गोवारीकर यांनी समाधान व्यक्त केले. मालिकांच नव्हे तर चित्रपटांचे चित्रीकरण येथे होणे आवश्यक असून त्यामुळे या चित्रनगरीची चित्रपट सृष्टी मध्ये चांगली प्रतिमा तयार होईल, असे मत व्यक्त केले.