कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ, सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खंडपीठ कृती समिती यांच्यात लवकरच मुंबईत संयुक्त बैठक बोलाविण्याबाबत प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील, उपाध्यक्ष तुकाराम पाडेकर यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी मंत्री आबिटकर यांची भेट घेऊन कोल्हापूर खंडपीठ स्थापनेबाबत पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.
४० वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत वकील, पक्षकारांसह सामाजिक संघटनांचा खंडपीठ होण्यासाठी लढा सुरू आहे. तो आणखी किती काळ करायचा, असा प्रश्न चर्चेत उपस्थित करण्यात आला. ॲड. मनोज पाटील, सूरज भोसले, प्रमोद दाभाडे, मनीषा सातपुते, प्रीतम पातले, वैभव पाटील, निखिल मुदगल, स्नेहल गुरव, हंसिका जाधव आदी उपस्थित होते.
नेमकी बैठक कधी?
कोल्हापूर खंडपीठासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. शासन सकारात्मक आहे. १५ मार्चपूर्वी खंडपीठाबाबत बैठक घेतली जाईल. या बैठकीत कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला जाईल, असे आश्वासन मंत्री आबिटकर यांनी खंडपीठाच्या मागणीसाठी दसरा चौकात २४ फेब्रुवारी रोजी एका उपोषणाची सांगता प्रसंगी केली होती. त्यामुळे ही बैठक नेमकी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.