कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये इचलकरंजीचे आमदार, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. ते हातात मशाल घेणार की अपक्ष निवडणूक लढवणार हे दोनच दिवसांत जाहीर होणार असल्याने येथील लढत तिरंगी होण्याचे संकेत आहेत.

महायुतीने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पाठोपाठ आवाडे यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये बंडखोरीचे वारे शिरले आहे. राहुल आवाडे यांनी महायुतीवर नाराजी व्यक्त केली. कोल्हापुरात उमेदवार देत असताना शिवसेना शिंदे गटाने पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार धनंजय महाडिक, अन्य पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले. हातकणंगलेत उमेदवार देत असताना आम्हाला, अपक्ष आमदारांना विचारात घेतले नसल्याचा आरोप आवाडे यांनी केला.

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

आताच का ?

२००९ साली लोकसभा निवडणुकीची तयारी केली होतो. तेव्हापासून मला शांत बसवण्यात आले. पुढील निवडणुकीवेळी मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. मतदारसंघ महिलाना आरक्षित झाला तर निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे यावेळी निवडणूक लढणारच, असे आवाडे म्हणाले.

हेही वाचा – काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

मातोश्रीवर भेट घेणार

दरम्यान, आवाडे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्या माध्यमातून ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सेनेकडूनही मतदारसंघात तगड्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. तो राहुल आवाडे यांच्या रुपाने संपू शकतो.