ठाणे : अरुणाचल प्रदेश येथील होणाऱ्या विधानसभेच्या व लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार असल्याचा दावा पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीपमध्ये घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र आणि नागालॅंडमध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्त पक्ष आहे. पॅरा १० इलेक्शन्स सिंबल रिझर्वेशन अँड ॲलॉटमेंट ऑर्डर १९६८ च्या आदेशान्वये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज केला होता. अरुणाचल प्रदेश येथे होणाऱ्या विधानसभेच्या सर्व जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. त्याचप्रमाणे लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार आहे. तशाप्रकारची अधिसूचना २३ मार्चला अरुणाचल प्रदेशबद्दल निवडणूक आयोगाने काढली आहे आणि लक्षद्वीपबद्दलही काढण्यात आली आहे, असा दावा परांजपे यांनी केला आहे.

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एक ज्येष्ठ नेते जे कायम हे वाक्य वापरतात की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो. पण, चुकीच्या माहितीवर आधारित कार्यक्रम करायला गेलो की कार्यक्रम इनकरेक्ट होतो. हे या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने लक्षात ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच कुठल्याही प्रकारचे गैरसमज माध्यमांनी देखील पसरवू नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांना टोला

आजपर्यंत महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या अनेक बैठका ट्रायडंटमध्ये झाल्या, अनेक बैठका वरळी येथील फोर सिजन्सवरही झाल्या. तिथे महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काय कुस्त्या झाल्या हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. त्यामुळे पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमधील चारही लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. संजय राऊत यांनी याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असा टोला परांजपे यांनी लगावला.

हेही वाचा – “नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”

हेही वाचा – बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा

जागांवर दावा केला नाही

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी व पालघर जिल्ह्यातील पालघर या चारही लोकसभेच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला नव्हता. त्यामुळे शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षात अंतिम निर्णय होईल. भिवंडीच्या जागेची उमेदवारी भाजपने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना जाहीर केलेली आहे. उरलेल्या तीनही जागांबाबत शिवसेना व भाजपमध्ये उत्तम ताळमेळ आहे, ते या तीनही जागेवरील उमेदवार लवकरच जाहीर करतील, असेही परांजपे यांनी सांगितले.