कोल्हापूर : कर्नाटक राज्यात पाणी सोडण्याचा कोणताही निर्णय न झाल्यामुळे राजापूर बंधारा पूर्णपणे भरला असून तो ओसंडून वाहण्याच्या (ओव्हरफ्लो) होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी मे महिन्यात कर्नाटक राज्यातील काही अज्ञातांकडून बंधाऱ्याचे बर्गे काढणे यावरून वाद उफाळून आला होता. हा वाद पुन्हा होऊ नये याची दक्षता घेऊन पोलीस प्रशासन देखील बंधाऱ्यावर तळ ठोकून आहे. सध्या बंधाऱ्यामध्ये १६ फुटावर पाण्याची पातळी गेली असून उद्या रविवार पर्यंत बंधारा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राजापूर येथे शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. उन्हाळा असल्याने राजापूर बंधाऱ्याच्या पुढे नदीपात्रास बंधाऱ्याची सर्व बर्गे घालून १६ फुटाणे पाणी अडविण्यात आले आहे. पाण्याचा एक थेंबही विसर्ग होत नाही. मात्र बंधा-याच्या खालील बाजूस पाणी पातळी खालावली आहे. कर्नाटक राज्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-शक्तिपीठ महामार्ग प्रश्न पुन्हा तापला; कोल्हापुरात १८ जूनला विराट मोर्चाचा संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

आठ दिवसांपूर्वी कर्नाटक हद्दीमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बंधा-याचे वरील बाजूचे बर्गे काढून नदीमध्ये टाकून पाण्याचा बेकायदेशीर विसर्ग सुरू केला होता.

शासनाची कोणतीही परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली होती. तसेच कर्नाटक राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये राजापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याने पुन्हा अज्ञातांकडून बंधाऱ्याची बर्गे काढून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर २४ तास गस्त घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.