कोल्हापूर : राज्यामध्ये पुरस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. इंदापूर येथे झालेल्या या भेटी वेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री भरणे यांना राज्यात कोणकोणत्या भागात कशाप्रकारे शेत पिकांचे नुकसान झाले आहे याची सविस्तर माहिती दिली.

राज्यात यावर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धापासून पावसाला सुरुवात झाली आहे. सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून पीक वाढीवरही परिणाम होऊ लागला आहे. महापूर व अतिवृष्टीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे २0 लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागामध्ये जमीनी खरडून गेल्या असून पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल, कृषी विभाग आणि ग्रामसेवक यांच्याकडून सुरू आहे. 

राज्यातील अनेक भागामध्ये एका दिवसात जवळपास ३०० मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील शेतक-यांची सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे इंदापूर येथे भेट घेऊन केली. गेल्या चार दिवसापासून राजू शेट्टी यांनी मराठवाडा , पश्चिम विदर्भातील अतिवृष्टी व पुरबाधित जिल्हयांचा दौरा केला. विशेषतः राज्यातील सर्वाधिक फटका नांदेड , धाराशिव , हिंगोली , बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा , विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांना बसला आहे. वरील जिल्ह्यातील कापूस , सोयाबीन , उडीद , मका , मूग , फळबागा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नदी व ओढ्या कडेला असणा-या जमिनी मधील पिके पंचनामे करण्यासही शिल्लक राहिलेली नाहीत.

मुळातच खते , बि -बियाणे , किटकनाशके , तणनाशके , औषधे यांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने व मजूरी बरोबर महागाई प्रचंड वाढल्याने शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यामध्येच केंद्र सरकारचे आयात निर्यात चे सातत्याने बदलते धोरण ,गडगडलेले बाजारभाव यामुळे दिवसेदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. राज्यातील पुरग्रस्त व अतिवृष्टी भागातील नुकसान झालेल्या शेतक-यांना सरसकट नुकसानभरपाईची मदत जाहीर करावी अन्यथा कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबला जाणार असून राज्यातील शेतकरी आत्महत्येचे संकट आणखी गडद होईल, अशी मागणी मंत्री भरणे यांच्याकडे यावेळी करण्यात आली.

यावेळी सतिश काकडे ,पृथ्वीराज जाचक, अमरसिंह कदम , राजेंद्र ढवाण पाटील , अजित बोरकर , धनंजय महामुलकर, नितीन यादव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.