कोल्हापूर : रविवारी भल्या पहाटे बोचऱ्या थंडीत माधुरी हत्ती परत आणण्यासाठी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेष पदयात्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सुरू केली आहे. त्याला सामान्य जनता, सर्वपक्षीय नेत्यांनी, महादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदवला.
नांदणी जैन मठ आणि त्याचबरोबर महादेवी हत्तीवर प्रेम करणारे विविध माध्यमातून चळवळ उभी करत हत्ती परत मठात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज पहाटे चार वाजता निघालेल्या पदयात्रेत लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले आहेत.
त्यानंतर या पशुसंग्रहालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अंबानी उद्याोग समूहाच्या मोबाइल सेवेवर बहिष्कार टाकण्याची मोहीम गतिमान झाली. याची दखल घेऊन पशुसंग्रहालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी तातडीने कोल्हापुरात दाखल झाले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी, पेटा संघटनेच्या तक्रारीवरून महादेवी हत्तीला गुजरातच्या वनताराला पाठवण्यात आले आहे. हा सर्व षडयंत्राचा भाग होता, असा गंभीर आरोप केला. त्यासाठी आत्मक्लेष पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला गेला. संस्कृती, इतिहास, परंपरा, वारसा या सगळ्या गोष्टी समाज म्हणून गेल्या १२०० वर्षापासून नांदणी मठाकडून जपल्या जात आहे. राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे शासनाचे हत्ती संगोपन केंद्र आहे. शिवाय कर्नाटक,केरळ येथेही हत्ती पुनर्वसन केंद्र असताना तो नेमका ‘वनतारा’कडे सुपूर्द करण्यास सांगितले जाण्याचे कारण काय. त्यामुळेच एकूणच या प्रक्रियेवर आम्हाला संशय येत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी राष्ट्रपतींनी करावी. त्यांना असलेल्या अधिकारातून हत्ती परत दिला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.
महादेवी हत्ती बाबत प्रसारित होत असलेल्या पत्राबाबत राजू शेट्टी यांनी सांगितले की, महादेवीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षित माहुत नसल्याने नांदणी मठाचे विश्वस्त माझ्याकडे येवून माहुत मिळेपर्यंत काही दिवसासाठी हा हत्ती वनविभागाच्या गडचिरोली हत्तीकेंद्रात सोडण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार मी २०२८ साली वनविभागास पत्रव्यवहार केला.
वनविभागाने या गोष्टीस असमर्थता दर्शवली. थोड्या दिवसांनी माहुतास अथक प्रयत्नातून नांदणी मठाच्या विश्वस्तांनी शोधून आणले. त्यादिवसापासून ते आजअखेर माधुरीची चांगल्या पध्दतीने देखभाल व काळजी घेतली गेली आहे. काही मंडळी खोडसाळपणाने राजकीय आकसापोटी म वनविभागास देण्यात आलेले जुने पत्र आता सोशल मिडीयावर व्हायरल केले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कोल्हापूर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींनी माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरु केली आहे. खासदारधैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचे घोषित केले आहे.