कोल्हापूर पाटबंधारे विभागाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत शेतीसाठी उपसाबंदी जाहीर करण्याच्या विरोधात लोकप्रतिनिधी व शेतक-यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पंचगंगा व भोगावती नदीक्षेत्रातील शेतक-याचे नुकसान होणार आहे. तरी उपसाबंदी रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, अशी इशारावजा मागणी शिवेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व करवीरचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांच्या शिष्टमंडळाने स्वतंत्ररीत्या कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी उपसाबंदी रद्द करणे शक्य नसून ती शिथिल केली जाईल, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता पाटील यांनी दिली.
पाटबंधारे विभागाने दूधगंगा प्रकल्पाबरोबरच आठ मध्यम व ५९ लघुप्रकल्पांसाठी ही उपसा बंदी जाहीर केली आहे. हा आदेश म्हणजे शेतक-यांना अडचणीत आणण्याचा प्रकार आहे. मुळात शेतीसाठी दररोज आठ तासच वीजपुरवठा केला जातो. त्यामध्ये प्रत्येक सोमवारी विद्युत विभागाकडून दुरुस्तीच्या कामाकरीता विद्युत पुरवठाच बंद असतो. राहिलेल्या सहा दिवसांत शेतक-यांना पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतक-याच्या पिकाला महिन्यातून कसाबसा एक पाण्याचा फेरा पूर्ण होतो. पाटबंधारे विभागाकडून सलग आठ दिवस पाणी उपसा बंदी केली तर शेतक-यांना महिन्यातून एकही पाण्याचा फेरा पूर्ण होणार नाही. वास्तविक कोगे खडक बंधा-याच्या बाजू असणा-या नदीपात्रास तीव्र उतार असल्याने कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नाही. त्यामुळे महिन्यातील काही दिवस शेतक-याना पाणी उपसाच करता येत नाही. करवीर तालुक्यातील उपवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाखाली येणा-या बोलोली, पासार्डे, खाटांगळे, म्हारुळ, आमशी या बंधा-यातून दहा दिवस पाणी उपसा बंदी केली आहे. हे बंधारे नादुरुस्त असून त्यातून मोठया प्रमाणात गळती होत असल्याने या ठिकाणी पाणी राहत नाही. परिणामी उपसा बंदीच्या कालावधी व्यतिरिक्त मिळणा-या वेळेमध्ये शेतक-यांना आपल्या जमिनीस पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतक-याची पिके करपून जाणार आहेत, असे आ. नरके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तर राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, उपसा बंदीमुळे शेतक-यांना अल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून हाता-तोंडाशी आलेली पिके वाळून जाणार आहेत. त्यावर कार्यकारी अभियंता पाटील म्हणाले, मुळातच दूधगंगा प्रकल्पातून क्षमतेपेक्षाही दीड टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे, तसेच सद्यस्थितीला उपसा बंदी रद्द करणे शक्य नाही तरीही उपसा बंदी शिथिल करून ती पाच दिवस करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
उपसाबंदी रद्द करण्याची मागणी
सावरवाडी पंचगंगा, भोगावती नद्यांमधील उपसाबंदी पाटबंधारे खात्याने जानेवारी ते मार्चअखेर या तीन महिन्यांसाठी सुरू केल्याने शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे. नदीवरील उपसाबंदी त्वरित रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे करवीर तालुका कार्यकत्रे शैलेंद्र पाटील यांनी केली आहे. यावर्षी दुष्काळ परिस्थितीला अनुसरून पिण्याच्या पाण्याचे कारण पुढे करून पंचगंगा, भोगावती नद्यांवरील पाटबंधारे खात्याने पंचगंगा, भोगावती नद्यांवरील तीन महिन्यांकरिता केलेली पाणी उपसाबंदी त्वरित रद्द करावी.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2016 रोजी प्रकाशित
शेतीसाठी उपसाबंदीवर शेतक-यांमध्ये प्रतिक्रिया
कोल्हापुरात आंदोलनाचा इशारा
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-01-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reaction of farmers on farming for lift ban