कोल्हापूर : चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी गेल्या तीन वर्षांपासून व्यापारी तोट्यात असतानाही त्यावर कोणतीही चर्चा केली नाही. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) सर्व संचालकांवर धनादेश न वटल्याबद्दल नोटीस येण्याची नामुष्कीची, गंभीर परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळेच सूतगिरणीच्या संचालक पदाचा राजीनामा देत असल्याचे पाच संचालकांनी सांगितले.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये महेश सातपुते, गजानन होगाडे, श्रीकांत हजारे या माजी अध्यक्षांसह गजानन खारगे, डॉ. विलास खिलारे यांचा समावेश आहे. यामुळे देवांग समाजाचे वर्चस्व असलेल्या या गिरणीच्या सभासदांसह सत्ताधारी गटात खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतर आलेल्या देवांग समाजाच्या संचालकातील दुभंग समोर आला आहे.
याबाबत महेश सातपुते यांनी सांगितले की, सूतगिरणीत १७ संचालक आहेत. त्यातील दोन संचालक मयत असून, उपाध्यक्ष पदावर असताना कर सल्लागार विलास पाडळे यांनी राजीनामा दिला आहे.
अध्यक्ष संजय कांबळे व कारभारी संचालक मंडळींच्या मनमानी कारभार सुरू आहे. उलट सूतगिरणीचे कामकाज अत्युत्तम असल्याचा आभास जनमाणसांत वारंवार निर्माण केला जात आहे. याला कंटाळून पाच संचालकांनी राजीनामा दिला आहे.
सूतगिरणीच्या कामकाजाबाबत समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे व सुकाणू समिती यांना कल्पना दिली. त्यांनीही याबाबत ठोस पावले न उचलता अध्यक्षांना पूरक भूमिका घेतली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.