शहराच्या विकासासाठी हद्दवाढ विरोधात ग्रामीण भागातील जनता रस्त्यावर उतरून संघर्ष करत असताना येथे झालेल्या सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत शहराच्या विकासासाठी हद्दवाढीसाठी प्रबोधन करून हद्दवाढ करण्यास विरोध करणा-या ग्रामीण जनतेचा गैरसमज दूर करण्याचा ठराव करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्ष महापौर अश्विनी रामाणे यांनी केंद्राच्या विविध योजना राबवण्यासाठी हद्दवाढ झाली पाहिजे. विरोध करणा-या गावांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
बैठकीत सर्वच वक्त्यांनी हद्दवाढ झालीच पाहिजे, या मुद्यावर भर दिला. त्याचे अनेक फायदे असून, ते ग्रामीण जनतेच्या मनात बिंबवण्याचा सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, हद्दवाढ झाली तर शहराचा विकास होईल. जे लोक विरोध करत आहेत त्यांची समजूत काढून फायदे-तोटे सांगावेत. हद्दवाढ व्हावी की होऊ नये हे थांबले पाहिजे. जे लोकप्रतिनिधी विरोध करत आहेत ते तेथील प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्या भावना मांडत आहेत, पण त्यांनी ते कुठे राहतात याचा विचार करून विरोध करावा, असा टोला सेनेचे आमदारद्वय चंद्रदीप नरके व सुजित मिणचेकर यांना घरचा आहेरच दिला.
शहर काँग्रेस प्रल्हाद चव्हाण म्हणाले, हद्दवाढ प्रकियेतून ज्या दोन एमआयडीसी वगळण्यात आल्या आहेत त्या घेण्यासाठी प्रयत्न करू. कृती समितीचे निमंत्रक आर. के.पोवार हद्दवाढ ही काळाची गरज असून, तसे झाले तर शहराच्या विकासात भर पडेल. कॉ. नामदेव गावडे म्हणाले, हद्दवाढ व्हावी की होऊ नये यावरील राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट कराव्यात. पक्षात एकमत झाले की हद्दवाढ होईल. कॉ. चंद्रकांत यादव म्हणाले, हद्दवाढ करण्यासाठी लोकसंख्येचा आकडा निश्चित करावा. सत्यजित कदम, महेश जाधव, संजय पवार, राजेश लाटकर, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, शारंगधर देशमुख, रामभाऊ चव्हाण, सुनील पाटील, मुरलीधर जाधव यांनी भूमिका मांडली.
आव्हान कडवे.. नेतृत्व तोकडे
हद्दवाढीच्या समर्थनासाठी जमलेल्यांची राजकीय कुवत मर्यादित आहे. अपवाद शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा. अन्यांनी मोठय़ा वल्गना केल्या, पण हे लोक ग्रामीण लोकांच्या शंकांचे समाधान करण्याच्या योग्यतेचे आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी प्रमुख लोकप्रतिनिधी समर्थनाच्या बाजूने येण्याची गरज आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2016 रोजी प्रकाशित
हद्दवाढीस विरोध करणा-यांचा गैरसमज दूर करण्याचा ठराव
शहराच्या विकासासाठी हद्दवाढीसाठी प्रबोधन
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-02-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resolution to remove misunderstanding resistant limit increase