कोल्हापूर : लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एस. पी. पी. थोरात आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) पी. एस. भगत या दोन व्यक्तीकडे देशाच्या लष्कराचे नेतृत्व सोपवले असते तर चीनकडून भारतीय सेनेची दशा झाली नसती आणि इतिहास वेगळा लिहिला गेला असता, असा गौप्यस्फोट मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी येथे बोलताना केला.
थोरात यांच्या यांच्या जीवनावर आधारित ‘माझी शिपाईगिरी’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन पित्रे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वारणा समूह विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते.
पित्रे म्हणाले, की चीन पाताळयंत्री शेजारी आहे, हे थोरात यांनी सर्वात आधी ओळखले होते. त्याची प्रचिती त्यांनी १ ऑक्टोबर १९५९ या दिवशी सरकारला सादर केलेल्या ‘मिलिट्री ॲप्रिसिएशन’ अहवालातून पुढे दिसून आले, असा उल्लेख करून पित्रे म्हणाले, की थोरात यांनी लिहिलेल्या ‘फ्रॉम रिव्हाईल टू रिट्रीट’ या पुस्तकातून नेतृत्वाचे वस्तूपाठ मिळतात. कोल्हापुरला लष्करी सेवेचा मोठा वारसा आहे. त्याच कोल्हापुरचे सुपुत्र थोरात यांच्यामुळे लष्करी सेवेत जाण्यासाठी अनेक मराठी तरुणांना अस्मितेचे स्फुलिंग मिळाले.
नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात म्हणाले, की लोकोत्तर पुरुषाचा मुलगा असल्याचे ओझे कधी वाटले नाही. एक सैनिक आणि एक वडील म्हणून त्यांचा संस्कार आम्हा तिन्हीं भावंडांना मिळाला. कर्तव्याशी प्रामाणिक असणाऱ्या वकील, पत्रकार, राजकारण्यांसह सर्वच क्षेत्रातील धैर्यवान, कर्तुत्ववान, निष्ठावान व्यक्ती हे खरे सैनिक आहेत हे या पुस्तकातून थोरात यांनी सांगितले.
आमचे थोरातांचे घर म्हणजे लघु भारत आहे. येथे पंजाब, बंगाली, तामिळनाडू आणि गुजराती संस्कृती या घरात सुखैनैव नांदतात, असा उल्लेख करून अभिनेते राहुल बोस म्हणाले, आमचे कुटूंब कोल्हापूरात दिवाळीला, कोलकात्यात दुर्गापूजेला एकत्र येतात. आजोबा बर्मा, मणिपूर, नागालँड, कोरियाच्या कथा सांगत, पण त्यात ते स्वत: कधी नायक बनायचे नाहीत.
शांतता, बंधुभाव आणि देश हे त्यातले नायक असायचे. डॉ. शिर्के म्हणाले, की पुस्तकातील अर्पणपत्रिका दोन्ही देशांच्या सैनिकांसाठी आहे. थोरात यांची ही माणुसकी, नैतिकता आणि मूल्यांचे शिक्षण शालेय अभ्यासक्रमात धडा म्हणून येण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी माजी उपाध्यक्ष उषा थोरात, अनिल मेहता, कांचन अनुजा कपूर, अनुराधा बोस उपस्थित होते. यावेळी राज अथणे, राहुल सुतार, प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे, राजश्री घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.