चोरी करण्यात सराईत असलेल्या तीन महिला तसेच रिक्षा चालकांसह सोमवारी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. सिंधू प्रकाश काळे, वंदना रामचंद्र भोवाळ, सुगला उत्तम कांबळे व रिक्षा चालक महावीर बापू लोंढे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांची उंची किमतीची वस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी या साहित्याची चोरी महाद्वार रोडवरील दुल्हन लेडीज शॉपी तसेच इतर ठिकाणच्या कापड दुकानमध्ये केली असल्याची कबुली दिली.
उपरोक्त तीन महिला राजेंद्रनगर या भागात राहतात. त्यांनी चोरी केलेला माल विक्रीकरिता रिक्षातून (एम.एच ०७ सी. २८२४) राजेंद्रनगर भागामध्ये आणणार असल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांना सोमवारी समजली. त्यानुसार त्यांचे एक पोलिस पथक एसएससी बोर्डानजीक असलेल्या रस्त्यावर उभे केले. दुपारी सदर रिक्षा राजेंद्रनगर रोडने शहराकडे भरधाव जात असल्याचे दिसल्यावर रिक्षाचा पाठलाग करून ती थांबवली. रिक्षाची तपासणी केली असता. त्यामध्ये पोलिस रेकॉर्डवर चोरी करण्यात सराईत असलेल्या सिंधू काळे (वय ४०) वंदना भोवाळ (वय ३०) व सुगला कांबळे (वय ५५) तसेच रिक्षाचालक महावीर लोंढे असे चौघे जण आढळून आले. रिक्षामध्ये उंची किमतीच्या नवीन साडय़ा, लेडीज ड्रेस मटेरियल, शर्ट, पँट, टॉप्स ४८ हजार ९०० रुपयांचा माल सापडला.