राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत : कोणाची सरशी?

शेती प्रश्नावरून दशकभरापासून साखर कारखानदार ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सळो की पळो करून सोडणारी खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत जोडी अखेर सोमवारी वेगळी झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे स्वाभिमानीबरोबरच दोघा  मित्रांची  मत्री ’सत्तासुंदरी’च्या  नादात  दुभंगली आहे. राजकीय बांध गाजवणारे संताजी – धनाजी आता आपले स्वतंत्र पक्ष, ध्वज घेऊन राजकीय फडात उतरणार आहेत. आता दोघेही उसाचे दांडके परस्परावर उगारणार असून, या राजकीय ’सामन्या’त  सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेणारे शेट्टी यांची की सत्तेच्या कच्छपी लागलेले खोत यांची सरशी होणार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाबरोबर बळीराजाचेही लक्ष लागले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेले सहा महिने सदाभाऊ खोत हे केंद्रिबदू ठरले आहेत. त्यांच्याकडील मंत्रिपदाची जबाबदारी वाढत जाईल, तसतसे वादाचे खटके उडू लागले. सुरुवातीला समाजमाध्यमातून सदाभाऊंना लक्ष्य केले गेले . त्यांचे चिरंजीव सागर यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेला विरोध आणि पराभव यातून खोत- शेट्टी यांच्यात थेट वाद रंगला. त्यानंतर या ना त्या कारणाने दोघांत शाब्दिक चकमकी होत राहिल्या. वादाने इतके टोक गाठले की उभयतांच्या घरांतूनही भलते -सलते बोलले जाऊ लागले. मुख्य म्हणजे राजकीय विचार आणि दिशा यामुळे मत्रीचा कडेलोट झाला.

दुभंगाची चाहूल

सदाभाऊ यांच्याकडे पाच खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी  सोपवण्यात आली आहे. त्यातून पक्षातील अनेकांमध्ये मत्सराची भावना दिसू लागली. तो समाजमाध्यमातून कडवटपणे प्रकट होऊ लागला. सदाभाऊंना बदनाम करणारी मोहीमच राबवली जावू लागली. त्यावर सदाभाऊंनी उघडपणे तक्रार केली. पण परिणाम शून्य. सदाभाऊंनी पक्ष कसा पोखरायला सुरुवात केली आहे, स्वतची फळी निर्माण करण्यास सुरुवात केली आहे, सत्तेच्या मेव्याधारे कार्यकर्त्यांना मोहात पाडले  जात आहे, जवळच्या कार्यकर्त्यांची कामे करायची, शेट्टी समर्थकांना जाणीवपूर्वक दूर लोटायचे .. असे अनेकानेक प्रकार कसे सुरु आहेत, याचा पाढा वाचला जाऊ लागला. अनेक जिल्ह्यातील असा अनुभव घेतलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी थेट शेट्टी यांच्याकडे तक्रार केली. अगोदरच खोत यांची पावले सत्ताधीशांच्या बाजूने पडत असल्याने शेट्टी नाराज होते, त्याला या तक्रारींची फोडणी मिळाली आणि मत्रीच्या नात्यात जाणवेल असे अंतर पडत गेले. वरकरणी दोघेही आमच्यात संवाद असल्याचे सांगत होते, पण मत्रीच्या कधीच ठिकऱ्या उडाल्या होत्या. उलट खाजगीमध्ये शिवराळ भाषा वापरत एकमेकांचा उद्धार केला जात होता.

कर्जमाफी आंदोलनामुळे दुराव्यात वाढ

शेट्टी असो की खोत, या उभयतांचा िपड लढवय्याचाच. आक्रमकता ठासून भरलेल्या या दोघांनी तत्कालीन आघाडीच्या  सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची संधी गमावली नाही. त्याचे फळ म्हणून शेट्टी दुसऱ्यांदा शिवारातून संसदेत पोहोचले तर रानोमाळ भटकंती करणाऱ्या खोत यांना मंत्रिपद मिळाले. पण मंत्रिपद हा खोत यांच्यासाठी धोक्याचा इशारा ठरला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहीजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी सत्तेत असणारे शेट्टी नवी दिल्लीपर्यंत धडक मारत राहिले. पण सदाभाऊ मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर याच  मागणीसाठी आपण शासनाकडे प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट करीत राहीले. त्यांनी रस्त्यावर येऊन लढण्याचे टाळले. हीच बाब वादात तेल ओतण्यास पुरेशी ठरली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेट्टी यांनी उघडपणे टिकेची तोफ डागण्यास सुरुवात केली. मंत्रालयावर मोर्चा काढला पण खोत तिकडे फिरकले नाहीत. या सर्वाचा परिणाम म्हणजे सदाभाऊंना पक्षाने आरोपीच्या िपजऱ्यात उभे केले. त्यांना म्हणणे मांडण्यास सांगितले. तथापि, सदाभाऊंनी ही चौकशी म्हणजे नाटक असल्याची टीका केली.  आपली वाटचाल वेगळ्या वाटेने जाणारी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

वाक् युध्द रंगणार

सदाभाऊ खोत यांची विचारधारा ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूची दिसते. पण ते सत्तेच्या कमळात अडकण्याची शक्यता नाही. स्वतंत्र पक्ष , संघटना स्थापन करण्याचा इशारा त्यांनी आधीच दिला आहे. मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने ते सत्तेच्या कलाने विचार मांडतानाच शेट्टी आणि आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवत ठेवून शेट्टी यांची प्रतिमा भंजन करत राहतील, असे दिसते. याउलट शेट्टी यांचा सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाज आणखी बुलंद होईल. वेळ येईल तेव्हा सत्ताधाऱ्यांपासून सोडचिठ्ठी घेण्याची भाषाही त्यांनी चालवली आहे. हे पाहता आगामी काळात एकेकाळचे संताजी – धनाजी यापुढे एकमेकांवर तलवारी उगारून परस्परांना नामोहरण करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, असे दिसते.