दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मदत या आठवडय़ात संपत आहे. करोना संसर्गाची साथ नसती तर एव्हाना निवडणुकीचा बार उडाला असता. आता निवडणुकीला दोन महिन्यांचा अवधी असला तरी दिवाळीतच निवडणूक प्रचाराचे फटाके फुटू लागले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण केले जाणार असा दावा केला जात होता. आता आघाडीतील प्रत्येक पक्षाने प्रचाराचा जणू नारळ फोडला असल्याने ही शक्यता मावळली आहे. भाजपनेही महापालिका ताब्यात घेण्याच्या दृष्टीने व्यूहरचना केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाडिक परिवार आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना यांच्या राजकीय अस्तित्वाची ही निवडणूक असणार आहे.

कोल्हापूर महापालिकेची पाच वर्षांपूर्वी ८१ जागांसाठी निवडणूक झाली असताना काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप – ताराराणी आघाडी व शिवसेना यांनी स्वबळ अजमावले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात निकाल लागला. काँग्रेस -२७, राष्ट्रवादी -१५, भाजप -१३, महाडिक प्रणीत ताराराणी आघाडी १९, शिवसेना ४ व अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल राहिले.

काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्ता स्थापन केली. शिवसेना सत्तेच्या बाजूने राहिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा महापालिकेत ‘चमत्कार’ होईल, अशी भाषा केली, पण तो अखेपर्यंत दिसला नाही. स्थायी समिती सभापती निवडणुकीत एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीला बेसावध ठेवत भाजपने आशीष ढवळे यांना निवडून आणले; हा एक अपवाद वगळता भाजप – ताराराणीला विरोधक म्हणूनच भूमिका बजवावी लागली.

विजयाचा नेत्यांना विश्वास

करोना संसर्ग सुरू झाल्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढे गेली आहे. या निवडणुकीची तयारी आतापासूनच सर्व पक्षांनी चालू ठेवली आहे. सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. गेल्या आठवडय़ात शिवसेना, राष्ट्रवादीचे मेळावे पार पडले. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सर्व ८१ प्रभागांत निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी २५ नगरसेवक निवडून येतील आणि सेनेचा महापौर होईल, असा विश्वास मेळाव्यात व्यक्त केला. काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांना पुढील वर्षांच्या अखेरीस होणाऱ्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक जागा निवडून आणणे हे महत्त्वाचे ठरणार असल्याने सूक्ष्म नियोजन केले आहे. किती जागा निवडून आणणार यावर थेट भाष्य करणे त्यांनी टाळले आहे. गेल्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ५० जागांवर भाजप निवडून येईल, असा व्यक्त केलेला विश्वास अनाठायी ठरला असल्याने सतेज पाटील यांनी सावध भूमिका घेत व्यूहरचनेवर भर ठेवला आहे.

विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्य़ातील राजकारणात भाजपची पीछेहाट झाली. भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादी कडे गेली. विधानसभेला दोन्ही आमदार पराभूत झाले. हे अपयश धुऊन काढणे हे भाजपचे लक्ष्य आहे. ‘कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन,’ असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केल्यावर ‘जिल्ह्य़ात सध्या विधानसभा निवडणूक होणे शक्य नाही’, असे विरोधकांनी दाखवून दिले होते. त्यामुळे कोल्हापुरात भाजपचे अस्तित्व किती ठळक आहे हे दाखवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. अर्थात त्यांची सर्व मदार ही प्रामुख्याने महाडिक परिवारावर असणार आहे. भाजपचे प्रदेश सदस्य, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यादृष्टीने प्रत्येक प्रभागात चाचपणी सुरू केली आहे. नव्याने स्थापन झालेल्या काही नगरपालिकांमध्ये भाजपचे नगरसेवक वाढले असल्याने विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने ही बाब महादेवराव महाडिक यांच्या पथ्यावर पडणारी आहे. त्याला कोल्हापूर महापालिकेतील यशाची जोड लागली तर त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक सोपी ठरू शकते. परिणामी सतेज पाटील यांचे वारू कोल्हापुरातच रोखण्याची महाडिक यांची चाल आहे.

छुपे राजकारण रंगणार

महापालिकेची निवडणूक वरकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप अशी चौरंगी असली असली तरी छुपी राजनीती वेगळीच असेल. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येण्यापूर्वीच कोल्हापुरात गेल्या दोन महापौर निवडीत हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. अशाच पद्धतीचे राजकारण गेल्या निवडणुकीतही घडले होते. इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता तिन्ही पक्ष एकत्र आले तर बंडखोरीचा अधिक धोका आहे; तो टाळण्यासाठी परस्परांना पूरक असे राजकारण पडद्याआडून केले जाण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा अंगानेच रंगण्याची चिन्हे आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self examination for kolhapur municipal corporation abn
First published on: 12-11-2020 at 00:13 IST