कोल्हापूर : एखादा अधिकारी फर्निचर विकायचे आहे असे म्हणत आहे, दुसरा मैत्रीची विनंती करतो आहे तर अन्य कोणाचे खातेच हॅक केला जात आहे. अशा नानाविध प्रकारांद्वारे हॅकरनी धुमाकूळ घातला असल्याने कोल्हापुरातील अधिकारी भलतेच त्रस्त झाले आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. यामुळे या अधिकार्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंट वरून मैत्रीची विनंती आली असेल तर सावधान! हे अकाउंट खोटे असू शकते. खाते हॅक करून तुमच्या मित्रांकडे पैशाची मागणी केली जाते. असाच अनुभव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे फेसबुक अकाउंट देखील हॅक करीत हॅकरने चक्क फर्निचर विकण्याचा संदेश धाडत ५५ हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या फेसबुक अकाउंटवरूनही त्यांच्या मित्राचे फर्निचर विकण्या बाबतचा संदेश पाठवला आहे. खऱ्या खोट्या संदेशाची शहानिशा न केल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. अशा हॅकरपासून सावध राहून कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नयेत, अशी विनंती अधिकाऱ्यांनी सोमवारी केली आहे.