ऐन सणासुदीच्या काळामध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करणे हा करवीरच्या नागरिकांवर अन्याय आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण पंचगंगेत बुडवावे आणि दोन दिवसात दररोज पाणीपुरवठा नियमित करण्याचा निर्णय न घेतल्यास महापालिका आयुक्तांचे पाणी जोडणी बंद करण्यात येईल,  असा इशारा शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेवर काढलेल्या मोर्चावेळी देण्यात आला. कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या दिवसाआड पाणी पुरवठय़ाविरोधात आवाज उठवत शुक्रवारी (आज) शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढला.

गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली असली, तरी यंदाच्या वर्षी मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्हातील बहुतांश धरणे भरली आहेत. नद्याही दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करणे आवश्यक असतानाही आजही दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसनिकांनी मोर्चा काढला.

मोर्चाची सुरवात शिवसेना शहर कार्यालयापासून झाली.  दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणांनी मोर्चा परिसर दणाणून सोडला. मोर्चा महानगरपालिकेवर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत आक्रमक महिलांनी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला.

या वेळी शिवसेना गटनेते नियाज खान यांनी महापौर अश्विनी रामाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिष्टमंडळास आमंत्रित केले. त्याच बरोबर आयुक्त पी. शिवशंकर यांना बठकीस बोलवून घेतले.

महापौर दालनामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठय़ाबाबत महापालिका प्रशासनास जाब विचारला. पाण्याचा अपव्यय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे होत असताना, त्याचे पाप नागरिकांच्या माथी मारण्यात येत आहे. पाणी गळतीतील अपयश लपविण्यासाठीच महानगरपालिकेने दिवसाआड पाणी पुरवठय़ाचा निर्णय घेतला असल्याचा आरोपही शिवसनिकांनी केला. रामाने यांनी, येत्या सर्वसाधारण सभेमध्ये दररोज मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावर सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव नामंजूर झाल्यास लोकप्रतिनिधींना विचारात न घेता निर्णय घेणाऱ्या आयुक्तांचे पाणी कनेक्शन बंद करू, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला.