कोल्हापूर : कागल येथे पारंपारिक वाद्यांच्या जुगलबंदीसह लोकसंगीतातून शिवजयंती निमित्त ताल उत्सवच्या कलाकारांनी रंगमंचावर शिवसृष्टी अवतरली. शिवजयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राला उंचीवर नेऊन ठेवलेल्या पखवाज, ढोलकी, तबला, ढोल, संबळ, तुणतुणे, टाळ, मृदुंग, बासरी, चिपळ्या, घुंगरू, हार्मोनियम, दिमडी, डफ, चौंडके अशा दोन डझनहून अधिक एकापेक्षा एक सरस पारंपरिक वाद्यांच्या तालावर उण्यापुऱ्या पंचवीशीतील दीड डझन कलाकारांनी शिवभक्तांना अक्षरशः ठेका धरायला लावला. खचाखच भरलेल्या जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरात या लोककलेला दाद देत मनमुराद आस्वाद लुटला.

हेही वाचा – कोल्हापुरात शिवजयंती उत्साहात; बोंद्रेनगरातील मराठा स्वराज्याचे आरमार आकर्षण

शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवातून पुढे आलेल्या कोल्हापूर येथील ऋषीकेश देशमाने प्रस्तुत ताल-उत्सव – जेथे वाद्ये बोलतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कलाविष्कार सादर केला. या कलाकारांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात अभंग, वासुदेव, भारुड, पोवाडा, विविध शिवगीते, धनगरगीत, नंदीबैल, लावणी, शेतकरी गीते अशा विविध पारंपरिक गीतांचा धरलेला फेर लक्ष्यवेधी ठरला.

काळाच्या ओघात पारंपरिक वाद्यांचा आवाज दुर्मिळ होत चालला असताना या स्थानिक कलाकारांनी “ताल उत्सव”च्या माध्यमातून पारंपरिक वाद्ये व लोकसंगीत यांचा समन्वय साधत पारंपरिक वाद्येही बोलू शकतात ही संकल्पना रुजवली.

यावेळी श्रीमंत अखिलेशराजे घाटगे, यशराजे घाटगे, म्हाडाचे सीईओ अशोक पाटील, बाबासाहेब पाटील, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील, रमेश माळी याच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शंतनू पाटील यांनी बहारदार निवेदन केले. स्वागत धैर्यशील इंगळे यांनी केले. आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.

हेही वाचा – कोल्हापुरात पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित, वळीवडेत मृत मासे नेण्यासाठी गर्दी; नदी प्रदूषणावरून संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी ओळख आहे. त्याऐवजी स्व. विक्रमसिंहराजे घाटगेंच्या स्वप्नातील आदर्श कागलची सांस्कृतिक विद्यापीठ अशी ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्थानिक कलाकारांच्या धार्मिक-पारंपारिक, ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लोकधारा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा ऐतिहासिक ठेवा युवा पिढीसमोर येत आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य साकारले. अशा थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सामाजिक जीवनात वाटचाल करीत आहोत. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे – राजे समरजितसिंह घाटगे (अध्यक्ष शाहू ग्रुप)