नवतंत्रज्ञानाशी हातमिळवणी करून टेक्नो-सॅव्ही राहण्याचा शिवाजी विद्यापीठाचा बाणा नव्या वर्षात आणखी एक तांत्रिक सुधारणेचे पुढचे पाऊल टाकताना दिसणार आहे. सरत्या वर्षांला निरोप देऊन नव्या वर्षांचे स्वागत करीत असतानाच शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने नववर्षांचा संकल्प म्हणून आपला कारभार अधिक पर्यावरणपूरक व गतिमान करण्याचा संकल्प केला आहे. याअंतर्गत महाविद्यालयांशी सर्व पत्रव्यवहार केवळ ई-मेलद्वारेच केले जाणार असून, त्यासाठी सर्व महाविद्यालयांना स्वतंत्र अधिकृत ई-मेल पत्ते देण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठाचा संलग्नित महाविद्यालयांशी होणारा सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार शुक्रवारी, १ जानेवारीपासून कागदविरहित होणार असून केवळ ई-मेलद्वारेच व्यवहार होणार आहेत.
शिवाजी विद्यापीठाने तांत्रिकदृष्टय़ा काळाशी सुसंगत राहण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करत आपल्या कारभारात गतिमानता आणण्यावर विद्यापीठाने भर दिला आहे. या तांत्रिक बदलाचा-स्वीकारार्हतेचा लाभ विद्यापीठ प्रशासन, प्राध्यापक, विद्यार्थी, अभ्यागत यांनाही व्हावा, असा यामागे विचार आहे. तंत्रकुशलतेची हीच भूमिका विद्यापीठ नव्या वर्षांत आणखी एका नव्या सकारात्मक वळणावर पोहोचेल, असा विश्वास प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. केवळ ई-मेलद्वारेच व्यवहार करण्याचा आधुनिक दृष्टिकोन विद्यापीठाने स्वीकारला असल्याची माहिती सरत्या वर्षांला निरोप देताना उपलब्ध झाली.
विद्यापीठातील अधिविभागप्रमुख, महाविद्यालये, प्राचार्य, संचालक यांना विद्यापीठाकडून कामकाजासंदर्भात पत्रव्यवहार, परिपत्रके पाठवली जातात. ती काही वेळेला महाविद्यालयास प्राप्त होत नाही अथवा विलंबाने मिळतात. महाविद्यालयाकडून माहिती वेळेत न मिळाल्यास शासनास पाठवण्यासही विलंब होतो. यासाठी विद्यापीठाने सर्व अधिविभाग, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांना अधिकृत असे स्वतंत्र ई-मेल आयडी दिलेले आहेत. त्यानुसार १ जानेवारीपासून विद्यापीठाकडील सर्व पत्रव्यवहार ई-मेलद्वारे करण्यात यावेत. त्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे, असे परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक निर्णय- कुलगुरू शिंदे
पर्यावरणपूरक व गतिमान प्रशासनासाठी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना त्यांचे स्वतंत्र, अधिकृत ई-मेल अकाऊंट निर्माण करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. या ई-मेल अकाऊंटचा वापर महाविद्यालयातील जबाबदार व्यक्तीला हाताळण्यासाठी देण्याबाबतचे संपूर्ण अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्याना राहतील. महाविद्यालयांना एखादा पत्रव्यवहार विद्यापीठाशी करावयाचा झाल्यास तो संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अधिकृत ई-मेलवर करावा, अशा सूचनाही महाविद्यालयांना देण्यात आल्याचेही कुलगुरू डॉ.शिंदे यांनी सांगितले.
महाविद्यालयांचा तांत्रिक ढिसाळपणा
विद्यापीठ प्रशासन वेळोवेळी महाविद्यालयांकडून ई-मेल आयडी मागवत असते. विद्यापीठाकडून पाठवलेले ई-मेल महाविद्यालयांकडून पाहिले जात नाहीत तसेच काही ई-मेल आयडी प्राचार्य व संबंधित सेवकांचे व्यक्तिगत असतात, असे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. अशा वेळी संबंधिताची बदली झाल्यास ई-मेलचे उत्तर न मिळाल्याने त्याचा परिणाम विद्यापीठ कामकाजावर होत असतो. हा प्रकार नव्या वर्षांत दूर होण्याची चिन्हे आहेत.