अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीची मतमोजणी कधी एकदा सुरू होते या अपेक्षेने जमलेल्या चित्रतारकांची मंगळवारी चांगलीच निराशा झाली. अत्यंत संथ गतीने मतमोजणी सुरू राहिल्याने कंटाळा आलेल्या उमेदवार आणि सभासदांनी मतमोजणी केंद्रावरतीच चक्क झोप काढली . मतपत्रिकांची मोजणी, त्यांचा मोठा आकार, कोणताही धोका पत्करायचा नाही, असा सावध दृष्टिकोन यामुळे मतमोजणी अंमळ रेंगाळली. निकाल हाती येत नसल्याने मुंबई, पुणे या केंद्रातून सतत फोन खणाणत राहिले, पण मतमोजणी सुरू नसल्याचे ऐकून त्यांना निराश व्हावे लागले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कोणाच्या ताब्यात जाणार याविषयी चित्रजगतात गेला महिनाभर एकच कुतूहल निर्माण झाले होते. रविवारी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच होती. विजय पाटकर, मेघराज राजेभोसले, संजय दुबे, संजय पाटील आदी मतमोजणी केंद्रात पोहोचले. संथगतीने मतमोजणीवर उमेदवार आणि पॅनेल प्रमुखांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी याबाबत नाराजीचा अर्ज दिला. रात्री ११ वाजेपर्यंत तरी निकाल जाहीर होणार का? अशी विचारणा उमेदवार करू लागले, तर कंटाळवाण्या मतमोजणी प्रक्रियेस कंटाळून अनेक उमेदवारांनी मतमोजणी केंद्रावरच झोप काढली . मतदानपत्रिका सुटय़ा केल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. १४ गटांपैकी स्थिर, छायाचित्रण, संकलन, रंगभूषा, ध्वनी, अभिनेत्री या विभागाच्या मतमोजणीस सुरुवात झाल्यावर जरासे हायसे वाटले, पण ही प्रक्रियाही संथच होती.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2016 रोजी प्रकाशित
चित्रपट महामंडळ मतमोजणी संथगतीने
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-04-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slow vote counting of film corporation in kolhapur