दयानंद लिपारे

कोल्हापूर : वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरणाचा विचार करून महसुली विभाजन करण्याच्या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात जोर चढला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या नगरीची महसूल व पोलीस आयुक्तालयाची मागणीही प्रलंबित आहे. इचलकरंजी महापालिकेचा नुकताच अंकुर उगवला असताना या शहराचा समावेश असलेल्या हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून आणखी दोन तालुके करण्यात यावे, अशी मागणी महसूलमंत्र्यांच्या ताज्या दौऱ्यात करण्यात आली. नव्याने नगरपालिका स्थापन करण्यासाठी जनांदोलन सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, कृषी, औद्योगिक, सहकार, पर्यटन अशा अनेक बाबींनी समृद्ध आहे. जिल्ह्याच्या नागरीकरण झपाटय़ाने वाढत आहे. जिल्हा विकासाच्या दिशेने झेपावत असला तरी महसुली विभाजन न झाल्याने प्रशासकीय पातळीवर कुचंबणा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

कोल्हापुरात महापालिका स्थापन होऊन पाच दशके उलटली तरी हद्दवाढ झालेली नाही. महापालिका हद्दवाढ समर्थक आणि ग्रामीणविरोधक यांच्यातील वाद जुना आहे. महापालिका हद्दवाढीची नव्याने मागणी होत आहे. दुसरीकडे, पुणे महसूल विभागाची लोकसंख्या अडीच कोटीवर गेली आहे. कामाची व्याप्ती पाहता प्रशासनावर कमालीचा ताण येत असल्याने कोल्हापुरात महसूल व पोलीस आयुक्तालय होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत पाटील हे महसूलमंत्री असताना त्यांच्याकडे या मागणीला गती आली होती. आता ते या प्रश्नाचा पुन्हा पाठपुरावा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नव्या तालुक्यांची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यात नवे तालुके निर्माण करण्याच्या मागणीचा वादही तसा जुना आहे. गगनबावडा, पन्हाळा व करवीर तालुक्यातील काही गावांना एकत्रित करून कळे हा नवा तालुका करण्याच्या मागणीसाठी यापूर्वीही आंदोलन झाले आहे. तर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामध्ये हातकणंगले तालुक्यात दोन स्वतंत्र तालुके निर्मितीची मागणी करण्यात आली. इचलकरंजीमध्ये महापालिका स्थापन झाली आहे. येथे प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय आहे. परंतु तहसील कार्यालय नाही. अपर तहसीलदार कार्यालय सुरू असले तरी इचलकरंजीकर तालुका मागणीची पूर्तता झाल्याशिवाय समाधानी होणार नाहीत असे दिसते. पेठ वडगाव येथेही स्वतंत्र तालुका करण्यासाठी अनेक वर्षांपासूनची कृती समिती पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे हातकणंगले तालुक्याचे विभाजन होवून नवा महसुली चेहरा कसा असणार याची चर्चा आहे. करवीर तालुक्याचेही विभाजन करून नवा तालुका निर्माण करावा, अशी मागणी महसूलमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

नगरपालिकांसाठी संघर्ष

कोल्हापूर जिल्ह्याच्या नागरीकरणाचा वेग पाहता ग्रामीण भागांना नगरपालिका होण्याचे वेध लागले आहे. जन आंदोलनातून हातकणंगले तालुक्यात चांदीनगरी हुपरी येथे चार वर्षांपूर्वी नगरपरिषद आकाराला आली. इचलकरंजी महापालिकेला खेटून असलेल्या कबनूर गावात स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. याच तालुक्यातील पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील ६० हजार लोकसंख्येच्या शिरोली गावात नगरपालिका होण्यासाठी २० वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. ‘‘शिरोलीकरांना महापालिका व कोल्हापूर प्राधिकरण अशा कोणत्या घटकांमध्ये समाविष्ट व्हायचे नाही. स्वतंत्र नगरपालिका सुरू व्हावी हाच आमचा आग्रह आहे’’, असे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण यांनी सांगितले.

५ लाख लोकसंख्येच्या इचलकरंजीतील महसुली कामांची

व्याप्ती आणि गरज लक्षात घेता स्वतंत्र तालुका झाल्यास येथील कामे द्रुतगतीने होतील. ही मागणी दीर्घकाळापासून शासनाकडे प्रलंबित असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिल्यावर त्यांनी इचलकरंजी स्वतंत्र तालुका व तहसील कार्यालय संदर्भात प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. हे काम मार्गी लागल्यानंतर नागरिकांच्या मागणीचा विचार करून नवीन इचलकरंजी जिल्ह्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– आमदार प्रकाश आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री.