कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा पाठिंबा कोणाला याचा निर्णय रखडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत नवनवीन नावे पुढे येत आहेत. आता यामध्ये मराठा क्रांती संघटनेकडून २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवलेले उद्योजक सुरेशदादा पाटील यांचे नाव येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांची उद्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाटील हे भाजपचे घटक पक्षाचे सहकारी आहेत. महाविकास आघाडी व पाटील यांचे जमले तर भाजपचा एक घटक पक्ष सुरेशदादा पाटील यांच्या रूपाने दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची लढत होणार आहे. महाविकास आघाडीने शेट्टी यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर राजू शेट्टी यांनी ती नाकारून बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. शेट्टी यांनी याबाबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली होती. पण अद्याप ठाकरे यांनी निर्णय दिलेला नाही. तर दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघ भाविका साखळीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे असल्याने डॉ. सुजित मिणचेकर व सत्यजित पाटील सरूडकर या माजी आमदारांपैकी एकाला लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या हालचाली मातोश्रीवर सुरू आहे. तर भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनीही मातोश्रीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा – अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

यामध्ये आता आणखी एका नव्या नावाची भर पडली आहे. ती म्हणजे सुरेश दादा पाटील यांची. मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कचे संस्थापक अध्यक्ष असलेले सुरेश दादा पाटील यांचे सहकारी यंत्रमाग, कृषी पूरक संस्था, मागासवर्गीय उद्योग संस्था असे बरेच उद्योग आहेत. उद्योजक असलेले सुरेशदादा पाटील यांनी भाजपकडे घटक पक्ष म्हणून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र आता माने यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याने पाटील यांनी महाविकास आघाडीकडे प्रयत्न चालवलेले आहेत. त्यासाठीच त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे संपर्क ठेवला आहे. उद्या शुक्रवारी ठाकरे – सुरेशदादा पाटील यांची भेट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर पाटील यांना उमेदवारी दिली गेली तर भाजपचा एक घटक पक्ष दुरावला जाणार असून तो महायुतीला धक्का धरण्याची चिन्हे आहेत.