कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील १०० गावांचा सर्व्हे नक्शा या प्रणालीमध्ये करणारा पथदर्शी प्रकल्प तयार करावा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीबाबत आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूरचा विकास झपाट्याने होत असल्याने वाढीव गावठाणाचा सर्व्हे करून मालमत्ता पत्रक मिळावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने बावनकुळे बोलत होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.

देवस्थान खरेदीस मज्जावराज्यात देवस्थान इनाम जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार केले जात आहेत. देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकार धोरण निश्चित करेपर्यंत या जमिनींची दस्तनोंदणी करणे थांबविण्यात यावी. सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीखेरीज किंवा न्यायालयाचे आदेश असल्याशिवाय खरेदी-विक्रीची नोंदणी केली जाऊ नये. तसे आढळल्यास दुय्यम निबंधक यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही बावनकुळे म्हणाले.

अशी असते नक्शा प्रणाली

एका विशिष्ट स्थानावर विदा एकत्रित करून ती नकाशावर दर्शविणे, त्याचे विश्लेषण करणे याला नक्शा प्रणाली असे म्हणतात. ज्याद्वारे भूभागाचे वर्णन, माहितीचा अभ्यास करता येतो.