कोल्हापूर : पंचगंगा नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच विविध सामाजिक संघटना, महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त पहाणीत ४२ दशलक्ष लिटर सांडपाणी पंचगंगेत मिसळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यातील गंभीर गोष्ट म्हणजे अनेक नाल्यांमधील सांडपाणी हे मैलामिश्रीत आणि काळे असून ते फेसाळलेले होते. इचलकरंजी येथेही तीच स्थिती असल्याचे समोर आले आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. तरी ज्या ज्या कारणांमुळे नदी प्रदूषित होते त्यांच्यावर समयमर्यादा ठेवून कारवाई व्हावी आणि वर्षभर ज्या प्रमुख कारणांमुळे पंचगंगा नदी प्रदूषित होते त्यावर प्रथम कारवाई करावी, या मागणीचे निवेदनही या प्रसंगी देण्यात आले.

आणखी वाचा-कोल्हापूरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशा पाठवा; हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘पंचगंगा नदी प्रदूषणावर सध्या काम चालू असून शहर आणि ग्रामीण भागातील सांडपाणी प्रक्रिया न करता मिसळू नये यांसाठी शुद्धकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. दोन-अडीच वर्षे हे काम चालेल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रसंगी सांगितले.

सध्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी जलपर्णी वाढलेली आढळते. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी. नदी प्रदूषणाचे प्रमुख कारण हे नदीत मिसळणारे सांडपाणी, तसेच अन्य विविध घटक हेच असल्याने यावर्षीपासून पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेटस्’ लावून भाविकांना मूर्तीविसर्जन करण्यास बंदी न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे, त्यांना ते करू देण्यात यावे, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.