कोल्हापूर : नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्तीला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापुरात पथक दाखल होताच त्यावरून येथे तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या हत्तीला घेऊन जाण्यास गावकऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केला असून, यासाठी शुक्रवारी ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला. तसेच या मागणीसाठी गावात बंदही पाळण्यात आला. दरम्यान, या हत्तीला ताब्यात घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे या धर्मपीठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी सांगितले.

नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन महालक्ष्मीसेन भट्टारक स्वामी यांचा मठ आहे. दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील जैन भाविकांचे हे तीर्थक्षेत्र आहे. मठामध्ये हत्तीपालनाची धार्मिक परंपरा आहे. सध्या येथे २४ वर्षीय महादेवी नावाचा हत्ती आहे. या हत्तीचे संगोपन योग्य पद्धतीने केले जात नाही, असा मुद्दा घेऊन ‘पेटा’ या संघटनेने हत्तीकल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीकडे तक्रार केली होती. या समितीने, तसेच पुढे उच्च न्यायालयाने हा हत्ती गुजरात येथील वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात यावा, असा आदेश दिला आहे.

त्या आधारे हत्ती घेऊन जाण्यासाठी एक पथक कोल्हापूर जिल्ह्यात नुकतेच दाखल झाले. ही माहिती समजतात नांदणी गावात गुरुवारी रात्रीच ग्रामस्थ जमा झाले. तसेच हजारो जैन बांधव, मठाचे भाविकही नांदणीत दाखल झाले. या हत्तीला ताब्यात घेतले जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी जोरदार विरोध दर्शविला. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नांदणी गावात बंद पाळण्यात आला. संतप्त गावकरी, जैन बांधव आणि भाविकांनी मूक मोर्चा काढत या कृतीला विरोध दर्शवला.

सर्वोच्च न्यायालयात दाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड, आजरा भागात हत्तीकडून शेतीचे अतोनात नुकसान होत असते. त्या उपद्रवी हत्तींऐवजी चांगले संगोपन केलेला मठातील हत्ती घेऊन जाणे गैर आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे, असे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी सांगितले.