कोल्हापूर : गावातील पानंद रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी पुणे येथे अभियंता असलेल्या तरुणाने नांदणी (ता. शिरोळ) गावात उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहन मगदूम या तरुणाच्या तब्येत खराब झाली आहे. आंदोलनाकडे कोणत्याही राजकीय पक्षांनी, अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने त्याचीही चर्चा होत आहे.
नांदणी गावातील रोहन मगदूम हा पुणे येथे अभियंता आहे. गावातील २४ लाख रुपये खर्चाच्या पानंद रस्त्याला ११ महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली आहे. हे काम अजूनही सुरू झालेले नाही. यामुळे तीन दिवसापूर्वी रोहन याने बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. या कालावधीत अन्न, पाणी न घेतल्याने रोहन याची तब्येत खालावली आहे.
अंध बांधवांची साथ
तरीही त्याच्या चौकशीसाठी कोणीही आलेले नाही. गावातील अंध बांधवांनी त्याच्या आंदोलनाला डोळस साथ दिली आहे. आम आदमी पक्षाने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यावर मगदूम ठाम आहे.