जमावाच्या हल्ल्यात बिबटय़ाचा मृत्यू
शाहूवाडी तालुक्यातील लोळाने गावाच्या हद्दीत मंगळवारी बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. या हल्ल्यानंतर जमावाने प्रतिहल्ला करत बिबटय़ास मारून टाकले. यशवंत भाऊ कंक असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे.
शाहूवाडी पोलीस ठाण्याचा हद्दीतील लोळाने गावाचे भरिचीवाडी ते गावठाण यामधील रोडवर हा प्रकार घडला. या भागात बिबटय़ा, तरस, गवे यांसह जंगली श्वापदांचा वावर नेहमीच असतो. यशवंत कंक हे त्यांच्या मुलीस शाळेत सोडण्यासाठी सकाळी ७ वाजता गेले होते. तेथून परत येत असताना बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये ते जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता १५० फूट अंतरावर असणारे शेतकरी तुकाराम भिवा पाटील व त्यांच्या पत्नी या दोघांनी तिकडे धाव घेतली. पाठोपाठ आणखी काही अंतरावर असणारे गावातील इतर लोक व गवत कापण्यासाठी आलेले ग्रामस्थ तेथे जमा झाले. त्यांना हल्ला करणारा बिबटय़ा दिसून आला. जमावाला पाहून बिबटय़ा आणखीच पिसाळला. डरकाळी फोडत त्याने परत लोकांवर हल्ला केला. त्यामध्ये लक्ष्मण पाटील (वय ५५) व मारुती जाधव (वय ५०) यांना किरकोळ जखमी केले. हा प्रकार पाहून लोक घाबरून गेले.
बिबटय़ाचा हा प्रताप पाहून गावातील लोक संतप्त झाले. त्यांनी जिवाच्या आकांताने बिबटय़ास लक्ष्य केले. जमावाने प्रतिहल्ला चढवत बिबटय़ाला मारून टाकले. घटनास्थळी वन विभाग व पोलीस पोहोचले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत बिबटय़ाचे शवविच्छेदन केले. दोघे जखमी हे बाह्य रुग्ण आहेत. यशवंत कंक यांना मलकापूर दवाखाना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळ हे पोलीस ठाण्यापासून १८ किमी अंतरावर आहे. या भागातील जंगली श्वापदांचा बिमोड करावा अशी मागणी या भागातील असुरक्षित लोकांकडून होत आहे.