कोल्हापूर : भारतातील पारंपरिक कला, कौशल्य आणि विविध हस्तकला यांचा अनेकदा जागतिक पातळीवर गैरवापर होत असल्याचे उदाहरणे समोर आली आहेत. बौद्धिक संपदा हक्कांबाबत अपुऱ्या माहितीमुळे हा गैरवापर रोखण्यात अडचणी येतात. कोल्हापुरी चप्पलबाबत झालेल्या वादाच्या या पार्श्वभूमीवर बौद्धिक संपदा हक्कांबाबत व्यापक प्रबोधन व जागरूकता गरजेची असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील सचिव हिमानी पांडे यांनी व्यक्त केले.

प्रसिद्ध जागतिक फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने त्यांच्या फॅशन शोमध्ये भारताच्या परंपरेचा अभिमान असलेल्या कोल्हापुरी चप्पलचे डिझाइन वापरले. मात्र, हे वापरताना त्याचे मूळ भारतात असल्याचे श्रेय दिले नाही. या घटनेनंतर देश-विदेशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत वाणिज्य व उद्योग संवर्धन विभागतर्फे नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भारतीय कलाकुसरीच्या हक्कांचे रक्षण, भौगोलिक उपदर्श नोंदणीतील त्रुटी आणि पुढील कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापुरी चप्पलच्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बळकटी कशी देता येईल, यावरही चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

या बैठकीस ‘लिडकॉम’च्या कार्यकारी संचालक प्रेरणा देशभ्रतार, लिडकरच्या संचालिका वसुंधरा, भौगोलिक उपदर्शक नोंदणी विभागाचे अधिकारी, लेदर कौन्सिल ऑफ इंडियाच्या निधी केसवानी, फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अधिकारी, सहसचिव उपल पंडित, करण थापर, महाराष्ट्र चेंबरकडून डॉ. धीरज कुमार, कोल्हापुरी चप्पल उत्पादक राजन सातपुते उपस्थित होते.

या बैठकीत झालेली चर्चा आणि त्याच्या निष्कर्ष याप्रमाणे – लिडकॉम आणि लिडकरने प्रादा विरुद्ध कायदेशीर कारवाईची भूमिका घेतली. ललित गांधी यांनी कायदेशीर कारवाईतून कारागिरांना प्रत्यक्ष लाभ होणार नाही, उलट ‘प्राडा’सोबत सहकार्याने बाजारपेठ उभारणी व थेट खरेदीची संधी मिळेल, अशी भूमिका मांडली.

आधुनिक प्रशिक्षण केंद्र

कोल्हापूरमध्ये आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारून नवीन पिढीला जागतिक मानकांची माहिती देण्याची सूचना ललित गांधी यांचेकडून करण्यात आली.

केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद

सचिव हिमानी पांडे यांनी ललित गांधींच्या भूमिकेला मान्यता देत, कोल्हापुरी चप्पलसाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्याची हमी दिली.

प्रादा सोबत सहकार्य वाढवून कोल्हापुरी चप्पल जागतिक ब्रँड म्हणून ओळख मिळवण्यासाठी प्रयत्न वाढवले जातील. त्याचबरोबर, कारागिरांच्या हक्कांचे रक्षण आणि भौगोलिक उपदर्श प्रक्रियेतील सुधारणा यावर केंद्र आणि राज्य पातळीवर विशेष पुढाकार घेतला जाईल.