कोल्हापूर : नानाविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी मंगळवारी पारंपरिक शिवजयंती शहरासह जिल्ह्यात साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख चौक, मंडळांच्या ठिकाणी चैतन्याचे वातावरण दिवसभर पसरले होते. या वेळी काही मंडळांकडून मिरवणुकाही काढण्यात आल्या.
कोल्हापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अमाप उत्साहात पारंपरिक शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रमुख मंडळांच्या वतीने यंदा शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी जागर केला. प्रथेनुसार छत्रपती शिवाजी चौक येथे जन्मकाळ सोहळा झाला. आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आर. के. पोवार, महेश जाधव, ईश्वर परमार, किशोर घाटगे, बंटी सावंत, उमेश बुधले उपस्थित होते. संयुक्त शुक्रवार पेठेतर्फे महिलांचा ओटी भरणे, रांगोळी स्पर्धा, संयुक्त राजारामपुरी मंडळाच्यावतीने जन्मकाळ, व्याख्यान, वाघनखं नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी केली.
निस्सीम शिवभक्ताचा अंत
गंगावेश परिसरातील शिवसैनिक, निस्सीम शिवभक्त मारुती उर्फ बाळासाहेब निगवेकर हे दरवर्षी प्रमाणे मोटारसायकलवर शिवरायांची मूर्ती ठेवून ध्वनी यंत्रणेवर शिवरायांची गाणी लावून फेरफटका मारत असताना चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.